गोखले ब्रिज एप्रिलपर्यंत खुला होण्याची शक्यता



महाराष्ट्रातील (maharashtra) विधानसभा निवडणूक आणि आचारसंहिता संपल्यानंतर आता अंधेरी पूर्व (andheri) आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची दुसरी बाजू तयार करण्याचे काम हाती घेण्यात आली आहे.

या कामासाठी पालिका (bmc) प्रशासनाने कामाचा वेग वाढवला आहे. त्याचबरोबर गोखले पुलाच्या दुसऱ्या बाजूची आणि बर्फीवाला पुलाची जोडणी करण्याच्या कामालाही आता वेग येणार आहे.

बर्फीवाला पुलाची उर्वरित बाजू वर उचलण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. एप्रिलपर्यंत संपूर्ण गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाच्या दोन्ही बाजू सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

अंधेरी स्थानकात रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या गोखले पुलाची उत्तर दिशेची बाजू फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. मात्र अंधेरी पश्चिम दिशेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी समांतर नसून वरखाली झाली होती. त्यामुळे बर्फीवाला पूल बंदच ठेवावा लागला होता.

तसेच या दोन पुलांमध्ये अंतर पडल्यामुळे मुंबई महापालिकेवर (BMC) टीकाही झाली होती. गोखले पूल (gokhale bridge) आणि बर्फीवाला पूल (barfiwala bridge) जोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई आयआयटी आणि व्हिजेटीआय या संस्थांची मदत घेतली. 

त्यांनी दिलेल्या अहवालानुसार हे दोन पूल जोडण्यासाठी जॅक लावून बर्फीवाला पुलाचा काही भाग वर खेचून पातळी समांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

त्यानुसार बर्फीवाला पुलाची एक बाजू वर उचलण्याचे अवघड काम पूर्ण करण्यात आले. जुलै 2024 पासून बर्फीवाला पूल आणि गोखले पूल या दोन्ही पुलांची उत्तरेकडची बाजू जोडण्याचा कामाला सुरुवात झाली. 

मात्र या दोन्ही पुलाची दक्षिणेकडची बाजू जोडण्याचे काम अद्याप शिल्लक आहे. गोखले पुलाची दक्षिणेकडची बाजू विविध कारणांमुळे रखडली आहे.

गोखले पुलाच्या दक्षिणेकडील बाजूचा भाग नुकताच रेल्वे मार्गावर स्थापन करण्यात आला आहे. तसेच हा भाग आठ मीटरपर्यंत खाली आणण्याचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता दक्षिणेकडील बाजूचा भागाचे काँक्रीटीकरण करण्याबरोबरच पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांचे कामही सुरू करण्यात आले आहे.

ही कामे सुरू असतानाच आता बर्फीवाला पुलाची दक्षिणेकडची बाजू उचलण्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. 

एप्रिल महिन्यात गोखले पुलाची दक्षिण बाजू सुरू करण्याचा प्रयत्न आहेच. यासोबतच बर्फीवाला पुलाचीही दक्षिण बाजू जोडून हा पूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाने कामाचा वेग वाढवला आहे. 


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24