‘त्या’ महिलेच्या मृत्यूला मेट्रो कंत्राटदार, प्राधिकरण जबाबदार : समिती



अंधेरी पूर्व येथे गेल्या बुधवारी रात्री पावसाळी पाण्याच्या उघड्या गटारात पडून विमल अनिल गायकवाड (४५) या महिलेचा मृत्यू होण्याचा दुर्घटनेस प्रामुख्याने त्या ठिकाणी मेट्रोचे काम करणारी एलॲन्डटी ही कंपनी तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन जबाबदार आहे, असा निष्कर्ष महापालिकेने नियुक्त केलेल्या समितीने काढला आहे. तेथील स्थानिक पालिका कर्मचाऱ्यांनीही दक्षता बाळगली नाही, असे समितीने म्हटले आहे.

अंधेरी (पूर्व) मधील सीप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू ओढवला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सोमवारी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केला.

ही दुर्घटना घडलेले ठिकाण आणि परिसर हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) चे कंत्राटदार एलॲन्डटी यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एलॲन्डटी तसेच एमएमआरसीएल यांची असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला आहे. या ठिकाणी पावसाळी पाण्याचे गटार उघडे होते.

दुर्घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्रिसदस्यीय समितीने घटनेची सखोल चौकशी करून निरीक्षणे नोंदवली आहेत आणि त्या आधारे निष्कर्ष मांडले आहेत.

अहवालातील निष्कर्षानुसार, सदर घटनास्थळ व सभोवतालचा परिसर हा सन 2015 पासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) चे कंत्राटदार एलॲन्डटी यांच्या ताब्यात आहे.

महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणीमध्ये आढळलेल्या त्रुटी कंत्राटदार एलॲन्डटी यांना कळवल्या होत्या. त्यावर, दोष दायित्व कालावधीमध्ये महानगरपालिकेला काही त्रुटी आढळल्यास त्यांची पूर्तता करण्यास बांधिल आहे, असे एलॲन्डटी यांनी 24 ऑगस्ट व 29 ऑगस्ट 2024 च्या पत्राद्वारे एमएमआरसीएल यांना कळविले होते.

एकूणच, दुर्घटनेच्या ठिकाणांच्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एमएमआरसीएलचे कंत्राटदार एलॲन्डटी आणि एमएमआरसीएल यांची आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या उच्चस्तरीय चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून परिमंडळ-3 चे उपायुक्त देविदास क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले. प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे समितीचे सदस्य होते.

पालिका कर्मचाऱ्यांवरही ठपका

के-पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या विषयाबाबत कार्यवाही केली आहे. असे असले तरी दुर्घटना घडली तो रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने आणि हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) घोषित केला असताना महानगरपालिकेच्या विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी दक्ष राहणे आवश्यक होते, असा निष्कर्ष देखील समितीने मांडला आहे.




Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24