मेंटल कॅल्क्युलेशनमध्ये चिमुकल्या मुंबईकरांची गगनभरारी



बालवयातील प्रज्ञावंतांची कसोटी पाहणाऱ्या ज्युनिअर मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 साठीच्या भारताच्या संघात मुंबईतील (mumbai) दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

आठ ते 12 वयोगटासाठी या स्पर्धेत भारतातून चार विद्यार्थी सहभागी होतील. त्यात पुणे आणि दिल्ली येथील प्रत्येकी एक आणि मुंबईतील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अंधेरीत राहणारा नऊ वर्षांचा हिरन हिना विनित राजानी आणि मुलुंडमध्ये (mulund) राहणारी 11 वर्षांची निवा सेजल विशाल गडा अशी या दोघांची नावे आहेत. 21 ते 23 सप्टेंबर  रोजी जर्मनीत होणाऱ्या स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करतील.

मेंटल कॅल्क्युलेशन म्हणजे काय?
कॅलक्युलेटर किंवा इतर कोणत्याही तांत्रिक उपकरणांचा वापर न करता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरे आकडेमोड तोंडी करणे, याला मेंटल कॅल्क्युलेशन म्हणतात.

एखादा दोन अंकी किंवा तीन अंकी क्रमांक संबंधित मुलासमोर स्क्रीनवर 30 मिलिसेकंद एवढ्या कमी वेळासाठी येतो. असे एकामागोमाग एक क्रमांक 30-30 मिलीसेकंद या वेळेच्या फरकाने समोर येत राहतात. हे नंबर बघता बघता त्या मुलांना त्यांची बेरीज करायची असते. शेवटी ती बेरीज बरोबर आहे अथवा नाही, हे तपासले जाते.

सध्या मेंटर कॅल्क्युलेशनमध्ये (mental calculation) एकाच वेळी एकामागोमाग एक येणाऱ्या 350 नंबर्सचा जागतिक विक्रम आहे. मुलुंडची 11 वर्षीय निवा 300 नंबरपर्यंतची आकडेमोड प्रत्येकी 30 मिलीसेकंद या वेळेत करू शकते. ती सध्या ‘जिनियस किड-इंडिया’ या संस्थेतून प्रशिक्षण घेत असून तीन ते चार महिन्यांत विश्वविक्रमाला गवसणी घालेल, असा विश्वास तिचे वडील विशाल गडा यांनी व्यक्त केला.

निवा सध्या ऐरोलीच्या युरो स्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत आहे. तिच्यासोबत अंधेरीच्या उत्पल शंघवी ग्लोबल स्कूलमध्ये शिकणारा नऊ वर्षांचा हिरन हिना विनित राजानी याचीदेखील या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आठ ते 12 या वयोगटातून स्पर्धेत सहभागी होणारा तो सर्वात तरुण स्पर्धक आहे. 

कशी होते वर्ल्ड चॅम्पियनशिप?
या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये या टीमला अडीच हजार मार्कांचा पेपर दिला जातो. त्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा आकडेमोडीशी निगडित प्रश्न असतात. हे प्रश्न त्यांना दोन तासांत सोडवायचे असतात.

विशेष म्हणजे या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी जगभरातील अल्जेरिया, बोस्निया-हर्जगोविना, बल्गारिया, चेक रिपब्लिक, जर्मनी, हंगेरी, जपान, पाकिस्तान, सर्बिया, दक्षिण आफ्रिका, युके अशा 22 देशांमधील 100 प्रज्ञावंत मुले सहभागी होणार आहेत.

जर्मनीच्या बाइल्फेल्ड येथे 21 ते 23 सप्टेंबर या दरम्यान ही जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा रंगेल. या स्पर्धेसाठी सर्वच स्पर्धक सहा महिने तयारी करत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून निवा आणि हिरन दोघेही दिवसांतील आठ तासांपेक्षा जास्त सराव करत आहेत, असे निवाचे वडील विशाल गडा यांनी सांगितले.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24