पालघर (palghar) जिल्ह्यातील वाढवण (vadhvan) बंदर (तवा) आणि समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे जोडण्यात येणार आहे. या 104.898 किलोमीटरच्या महामार्गास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
हा प्रकल्प महाराष्ट्र (maharashtra) राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला असून यासाठी ‘हुडको’कडून एक हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येईल. या कर्जासह दोन हजार 528 कोटी 90 लाख रुपयांच्या तरतुदीसदेखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
वाढवण बंदराच्या माध्यमातून जलमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशातील सर्व भागापर्यंत वेगाने व किफायतशीर किमतीमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने हे बंदर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडण्याचा हा प्रस्ताव आहे.
केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सागरमाला प्रकल्पांतर्गत सध्या वाढवण बंदर ते तवा पर्यंत 32 किमी महामार्गाचे काम हाती घेतले आहे.
समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदराकडे जाण्याकरिता भरवीर-आमणे (समृद्धी महामार्ग) ते वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरून जावे लागते. त्यामुळे जवळजवळ 82 किमी लांबीचा अनावश्यक प्रवास करावा लागतो.
वाढवण बंदराच्या भविष्यातील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक वर्दळीचा विचार करता विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक वर्दळीस उपयुक्त अशा महामार्गाची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे.
हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे.
वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास सद्याच्या 4 – 5 तासावरून साधारणतः 1 ते 1.5 तासावर येईल, यामुळे वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.
दळणवळण गतिमान झाल्याने पालघर, नाशिक जिल्ह्यांमधील लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्रांना याचा लाभ होणार आहे. यातून स्थानिकांना उत्तम रोजगार व उत्तम बाजारपेठ उपलब्ध होईल.
हेही वाचा