राज्यातील (maharashtra) पाच हजारांहून अधिक अंशत: अनुदानित खासगी शाळांना अनुदानाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घेतला होता.
मात्र 10 महिने उलटूनही निधीची तरतूद न झाल्याने संतप्त शिक्षकांनी 8 जुलै व बुधवार 9 जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही दिवस शिक्षकांनी (teachers) मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
टप्पा अनुदानाचा निर्णय झाल्यानंतर दोन अधिवेशने झाली व तिसरे अधिवेशन सुरू असूनही शासनाने पुरवणी मागणी सादर केली नाही. त्यामुळे शिक्षक समन्वय संघाने आंदोलनाचा पवित्रा तीव्र करत मुंबईतील (mumbai) आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. शिक्षक काम बंद ठेवून यात सहभागी होणार आहेत.
राज्यात सुमारे पाच हजार 844 अंशत: अनुदानित शाळा कार्यरत आहेत. यामध्ये प्राथमिक विभागाच्या 820, माध्यमिक एक हजार 984 आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या तीन हजार 40 इतकी आहे. या शाळांमध्ये सुमारे आठ हजार 602 प्राथमिक शिक्षक, 24 हजार 28 माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि 16 हजार 93 उच्च माध्यमिक कर्मचारी कार्यरत आहेत.
सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये टप्पा अनुदान लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 20 टक्क्यांपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने शाळांना अनुदान देण्याची योजना जाहीर झाली होती. मात्र यासंबंधी प्रत्यक्ष निधी वितरित झालेला नाही.
या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील प्रमुख शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. ‘हे आंदोलन आता शिक्षकांचे नाही, तर शिक्षण व्यवस्थेच्या सन्मानासाठीचे आहे,’ असे डावरे यांनी नमूद केले.
‘मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही’, असेही ते म्हणाले.
हेही वाचा