भारतात पॅरासिटामॉल मोठ्या प्रमाणात आणि अगदी सहजपणे उपलब्ध आहे. आपल्याकडे बरेच लोक थोडासा ताप आला किंवा लक्षण जाणवलं तरी ती घेतात. विविध ब्रँडपैकी डोलो 650 अलिकडच्या वर्षांत सर्वात लोकप्रिय म्हणून उदयास आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि आरोग्य शिक्षक पलानीअप्पन माणिकम यांनी हे वास्तव अधोरेखित केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत “भारतीय लोक डोलो 650 ला कॅडबरी जेम्ससारखे घेतात,” अशा शब्दांत त्यांनी भयाण वास्तवाचं वर्णन केलं आहे.
भारतातील डॉक्टर सामान्यतः ताप, डोकेदुखी, शरीरदुखी आणि सौम्य वेदनांसाठी डोलो-650 लिहून देतात. त्याचा प्रभाव आणि निर्देशानुसार घेतल्यास ते सामान्यतः सुरक्षित असते असं सांगितलं जातं. तथापि, कोणत्याही औषधाप्रमाणे, तिचा अतिवापर विशेषतः यकृतासाठी हानिकारक असू शकतो. त्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे आणि शिफारस केलेल्या डोसचं पालन करणे आवश्यक असतं. कोविड-19 साथीच्या काळात या औषधाची लोकप्रियता वाढली. कोविडमध्ये लसीकरणानंतर दुष्परिणाम टाळण्यासाठी पॅरासिटामॉल घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
Indians take Dolo 650 like it’s cadbury gems
— Palaniappan Manickam (@drpal_manickam) April 14, 2025
डोलोपर टॅब्लेटनंतर बाजारात आलेल्या डोलो-650 टॅब्लेटमध्ये पॅरासिटामॉल असते, जे प्रोस्टॅग्लॅंडिन सोडण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे वेदना, जळजळ आणि तापाची संवेदना होतात. ताप आल्यास ते शरीराचे तापमान देखील कमी करते.
फोर्ब्सच्या मते, 2020 मध्ये कोविड-19 ची साथ आल्यानंतर मायक्रो लॅब्सने डोलो-650 च्या 350 कोटींहून अधिक गोळ्या विकल्या आहेत. ज्यामुळे एका वर्षात 400 कोटींचा महसूल मिळाला आहे. मार्केट रिसर्च फर्म IQVIA च्या मते, साथीचा रोग सुरू होण्यापूर्वी मायक्रो लॅब्स दरवर्षी डोलो-650 च्या सुमारे 7.5 कोटी स्ट्रिप्स विकत असत. एका वर्षानंतर, 2021 च्या अखेरीस 14.5 कोटी स्ट्रिप्स गाठण्यापूर्वी ते 9.4 कोटी स्ट्रिप्सपर्यंत वाढले, जे 2019 च्या तुलनेत जवळजवळ दुप्पट होते.