Oral Care Tips: “इतर कोणतेही दुखणे परवडले पण हे दाताचे दुखणे नको रे बाबा!” दात दुखत असल्यावर तुमच्याही मनात असाच काहीसा विचार येत असेल. कारण दाताचे दुखणे इतके तीव्र असते की, कधी कधी असह्य होते. यावर उपाय म्हणून पेन किलरचे औषध घेतले जाते, पण त्याने फक्त काही काळच आराम मिळतो. नंतर पुन्हा दुखणे सुरू होते. दात कीडल्यामुळे किंवा दाढेला सूज आली असल्यास दात दुखण्याची समस्या उद्भवते. पण तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकता. जे दाताचे दुखणे कमी करण्यास झटपट पटापट मदत करू शकता.
प्राचीन आयुर्वेदात प्रत्येक आजारावर उपाय सांगितले गेले आहेत. आजही अनेक आधुनिक डॉक्टर उपचारासाठी आयुर्वेदाचा आधार घेत असतात. आपल्या रोजच्या आहारातील असे अनेक पदार्थ आहेत ज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदात कोणत्या आजारावर उपाय म्हणून कोणते पदार्थ का आणि कसे वापरावेत याबाबत सविस्तर माहिती दिली गेली आहे. त्यातील काही उपाय आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
लवंगचे तेल
दात दुखीसाठी लवंगचे तेल वापरणे अधिक फायदेशीर ठरते. यामध्ये असलेला युजेनॉल नावाचा घटक दुखणाऱ्या दातावर नैसर्गिक भूल देण्याचे काम करतो, यामुळे वेदनांचे प्रमाण कमी होऊन त्वरीत आराम मिळतो. तसेच यातील जंतुनाशक गुणधर्म दाताला कीड लागण्यास कारणीभूत असलेल्या जीवाणूंशी लढतात. काहीवेळा दंतवैद्य झिंक ऑक्साईडमध्ये लवंग तेलाचा वापर करतात. ज्यामुळे संवेदनशील मज्जातंतूना शांत करते.
लसूण पेस्ट
लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे घटक असते जो वेदना कमी करण्यास मदत करतो. यामधील अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म दातांचे आणि हिरड्यांचे संसर्गापासून संरक्षण करते. यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. दात दुखीवर लसूण पेस्ट वापरणे हा एक नैसर्गिक आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.
कांद्याचा रस
दात दुखत असल्यास कांद्याचा लहान तुकडा तोंडात ठेवा आणि चघळा. यामुळे तुकड्यातून निघणारा रस दुखणाऱ्या दाताला प्रभावित करेल. कांद्यामध्ये असलेले अँटीसेप्टीक गुणधर्म दातांच्या आजूबाजूचे जंतू नष्ट करतात. कांद्यामध्ये असलेले गुणधर्म नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्यास मदत करतात. यामुळे सूजही कमी होते.
जास्वंदाची पाने
जास्वंदाच्या पानांमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे हिरड्यांची सूज कमी करण्यास मदत करतात. तुम्ही जास्वंदाची पाने गरम पाण्यात उकळवून, त्या पाण्याने गुळण्या करू शकता. ज्यामुळे दात दुखीवर त्वरीत आराम मिळतो.
या सर्व घरगुती उपायांसह नेहमीच दातांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दातांची नियमित आणि योग्य स्वच्छता करणे आवश्यक आहे. तसेच दाताच्या दुखीची तीव्रता अधिक जास्त असेल तर अशावेळी दंतवैद्यांचा सल्ला घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)