Know the reason behind sensitive Teeth: आपल्या शारीरिक आरोग्याप्रमाणे दातांच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपण दिवसभरात तिखट, गोड, आंबट असे वेगवेगळ्या चवीचे कितीतरी पदार्थ खात असतो. अशावेळी दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाड दुखणे, कीड लागणे, दातांची मजबुती कमकुवत होणे अशा समस्या उद्भवतात. या समस्यांमुळे जेव्हा आपण काही गोड किंवा थंड पदार्थ खातो तेव्हा दातांना झिणझिण्या येतात आणि दात दुखू लागतात. काहीवेळा हे दुखणे असहय्य असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की फक्त थंड पाणी पिताना किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्यास दातांना झिणझिण्या का येतात? चला तर मग यामगचे खरे कारण जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या मते, दातांच्या समस्या होण्याचे मूळ कारण त्यांवर असलेला इनॅमल (Enamel) थराची कमी आहे. दातांवर असलेला हा जाड थर दाताच्या आतील संवेदनशील भागांचे संरक्षण करतो. आम्लयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे तसेच वाढत्या वयात इनॅमल थराची झीज होऊ लागते आणि दात अधिक संवेदनशील होतात. एकदा इनॅमलची झीज झाली की, तो पुन्हा तयार होत नाही म्हणूनच त्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
दातांवरील या संरक्षक थराची झीज झाल्यास, परिणामी थंड किंवा गोड पदार्थ थेट दातातील नसांना स्पर्श करतात आणि त्या त्वरीत आकुंचन पावतात. यामुळेच संवेदनशीलता निर्माण होते आणि थंड पाणी, आइस्क्रीम किंवा गोड पदार्थाचे सेवन करताच अचानक झिणझिण्या येतात. पण याउलट, गरम पाणी पिल्यावर किंवा गरम अन्नाचे सेवन केल्यास असा त्रास कमी जाणवतो. यामागचे कारण म्हणजे गरम तापमानामुळे नसांना उब मिळते आणि त्या आकुंचन पावत नाहीत. म्हणून गरम पदार्थांचे सेवन केल्यास झिणझिण्या लगेच शांत होतात.
दंततज्ज्ञांच्या मते, दातांची संवेदनशीलता वाढत असल्यास दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. हलके दुखणेही पुढे जाऊन मोठ्या समस्येचे रूप घेऊ शकते. यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे संवेदनशीलता टूथपेस्टचा नियमित वापर करा. तसेच दातांवर जास्त दाब देऊन ब्रश करणे टाळा, गोड आणि थंड पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी करा. याशिवाय दर सहा महिन्यांनी एकदा डेंटल चेकअप करणे गरजेचे आहे. कारण झिणझिण्यांचा त्रास लहान वाटला तरी कालांतराने त्याचे रूपांतर गंभीर समस्यांमध्ये होऊ शकते. निरोगी दातांसाठी योग्य काळजी आणि वेळेवर उपचार करणे अधिक अनिवार्य आहे.
1. प्रश्न: थंड पाणी, आइस्क्रीम खाल्ल्यावर दातांना झिणझिण्या का येतात?
उत्तर: दातांवरील इनॅमल थर झिजल्यामुळे थंड,गोड पदार्थ थेट नसांना स्पर्श करतात आणि नसा आकुंचन पावतात, म्हणून झिणझिण्या येतात.
2. प्रश्न: गरम पदार्थ खाल्ल्यावर झिणझिण्या लगेच थांबतात, का?
उत्तर: गरम तापमानामुळे नसांना उब मिळते आणि त्या आकुंचन पावत नाहीत, म्हणून त्रास त्वरित कमी होतो.
3. प्रश्न: दातांच्या झिणझिण्यांवर काय करावे?
उत्तर: संवेदनशील दातांसाठी खास टूथपेस्ट वापरा, मऊ ब्रशने हलके ब्रश करा, गोड,थंड पदार्थ कमी खा आणि दर 6 महिन्यांनी डेंटिस्टकडे चेकअप करा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.