World AIDS Day 2025:’एचआयव्ही’ स्पर्शाने पसरतो का, या संसर्गाबद्दल असलेल्या गैरसजांमागचे सत्य काय?


World AIDS Day 2025: दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जगभरात ‘जागतिक एड्स दिन’ (World AIDS Day) साजरा केला जातो. एचआयव्हीविषयी जागरूकता वाढवणे, चुकीच्या समजुती दूर करणे आणि सुरक्षिततेचा संदेश समाजापर्यंत पोचवणे हे या दिनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जागतिक एड्स दिनाचा यावर्षीचा संदेश ‘एचआयव्ही साथीचा अंत: समुदाय, काळजी आणि एकता’ (Ending the HIV Epidemic: Community, Care & Solidarity) हा आहे.

Add Zee News as a Preferred Source

भारतात  मागील काही वर्षात एचआयव्हीविषयीची परिस्थिती सुधारली आहे. तरी अजूनही अनेक गैरसमजांमुळे एचआयव्ही  रुग्ण उपचारांपासून दूर राहतात. तज्ज्ञांच्या मते, एचआयव्ही हा संसर्ग रक्त, लैंगिक संबंध किंवा आनुवांशिकरित्या होतो. पण समाजात या संसर्गाबद्दल स्पर्श, एकत्र जेवण, हात मिळवणे किंवा साध्या दैनंदिन संपर्कातून हा आजार पसरतो असे गैरसमज आहे. पण यामागचे सत्य समाजासमोर आणून रुग्णांबद्दल भेदभाव न करता त्यांना मानसिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक औषधोपचारामुळे एचआयव्ही (HIV) रुग्ण आज पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकतात. मात्र, चुकीच्या समजुती आणि भीतीमुळे अनेकजण तपासणी आणि उपचार करणे टाळतात. म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून हे गैरसमज कोणते आहेत आणि त्यामागचे सत्य काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. 

 

एचआयव्ही संसर्ग स्पर्शाने पसरतो?

हे पूर्णपणे खोटे आहे! एचआयव्ही संसर्ग कधीही स्पर्शाने पसरत नाही. एचआयव्ही हा शरीरातील विशिष्ट द्रवपदार्थांमधून पसरतो, जसे की रक्त, वीर्य, स्त्राव आणि संक्रमित आईचे दूध. हात मिळवणे, मिठी मारणे, एकत्र जेवणे किंवा एखाद्याचे उष्टे खाणे, एचआयव्ही रूग्णाने वापरलेले शौचालय वापरणे किंवा पिण्याचे पाणी पिणे यातील कोणत्याही गोष्टींमुळे एचआयव्ही संसर्ग पसरत नाही.

 

एचआयव्ही आजारावर कोणताही उपाय नाही? 

एचआयव्ही हा आजार पूर्णपणे बरा करता येईल असे उपचार सध्या उपलब्ध नाही, पण त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते असे उपचार नक्कीच उपलब्ध आहेत. अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (ART) या प्रभावी उपचाराने एचआयव्ही विषाणूंचे प्रमाण कमी करता येऊ शकते. ज्यामुळे संसर्ग वाढण्यापासून रोखता येते. यामुळे एक एचआयव्ही बाधित व्यक्ती देखील सामान्य, दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. यासाठी शक्य तितक्या लवकर आजाराची लक्षणे ओळखून उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि नियमित औषधोपचार करणे महत्त्वाचे आहे. 

 

एचआयव्ही असल्यास लग्नसंबंध आणि मातृत्व शक्य नाही?

एचआयव्ही असूनही लग्नसंबंध आणि मातृत्व शक्य आहे, पण त्यासाठी योग्य वैद्यकीय मार्गदर्शन, उपचार आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी प्रभावी ठरते. यामुळे एचआयव्ही नसलेल्या जोडीदाराला संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. तसेच आई-वडीलांपैकी कोणी एचआयव्ही सकारात्मक असेल तर प्रगत प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करून बाळाला जन्म देणे शक्य आहे. ज्यामुळे बाळाला एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. 

 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित संबंध, स्वच्छ सुईंचा वापर, वेळोवेळी चाचणी करणे आणि योग्य औषधोपचार सुरू ठेवणे हे सर्वात प्रभावी मार्ग आहेत. एआरटी (Antiretroviral Therapy) उपचार पद्धतीमुळे रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात, तसेच वेळेवर उपचार घेतल्यास विषाणूंचा प्रसारही टाळता येतो.

 

 

 

१. प्रश्न: एचआयव्ही हा संसर्ग स्पर्शाने, मिठी मारून किंवा एकत्र जेवल्याने पसरतो का?
उत्तर: नाही, पूर्णपणे नाही! एचआयव्ही फक्त रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध किंवा आईच्या दुधातून पसरतो; हात मिळवणे, मिठी मारणे, एकत्र जेवण यातून कधीच पसरत नाही.

२. प्रश्न: एचआयव्ही झाल्यास आयुष्य संपले का? लग्न-मुलबाळ शक्य नाही का?
उत्तर: नाही! ART उपचाराने एचआयव्ही पूर्णपणे नियंत्रणात राहतो; रुग्ण सामान्य दीर्घायुष्य, लग्न आणि योग्य उपचार-तंत्रज्ञानाने निरोगी बाळही जन्माला घालू शकतात.

३. प्रश्न: एचआयव्ही टाळण्यासाठी काय करावे?
उत्तर: सुरक्षित लैंगिक संबंध, स्वच्छ सुई, वेळोवेळी तपासणी, लवकर ART उपचार सुरू करणे; आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एचआयव्ही रुग्णांबरोबर भेदभाव न करता त्यांना मानसिक आधार द्या.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *