Bollywood Nostalgia : हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास १००वर्षांहून अधिकचा आहे. या शतकभरात अनेक स्टार्सनी पडद्यावर खळबळ माजवली. काही कलाकार त्यांच्या रागीट स्वभावामुळे ओळखले जात होते, तर काही त्यांच्या हट्टीपणासाठी ओळखले जात होते. काही कलाकार त्यांच्या वक्तशीरपणामुळे चर्चेत असायचे, तर असेही काही कलाकार होते ज्यांनी सेटवर वेळेवर न येण्याची शपथच घेतली होती. अशाच कलाकारांमुळे एक चित्रपट प्रचंड चर्चेत आला होता. १९८०मध्ये प्रदर्शित झालेला ‘दोस्ताना’ चित्रपट, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत झीनत अमान मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. राज खोसला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटासाठी झीनत अमान यांना मोठी तडजोड करावी लागली. याचा खुलासा नुकताच शर्मिला टागोर यांनी केला आहे.