मुंबई7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

मराठी रंगभूमीवरील अभिजात कलाकृतींपैकी एक ठळक नाव म्हणजे विजय तेंडुलकरांचे गाजलेले नाटक ‘सखाराम बाइंडर’. 1972 साली पहिल्यांदा रंगमंचावर आलेल्या या वास्तववादी नाटकाने त्याकाळी प्रेक्षकांना अंतर्मुख केले आणि समाजमनाला धक्का दिला. स्त्री–पुरुष नात्यांचे निर्भीड आणि टोकदार वास्तव मांडणाऱ्या या नाटकाची ताकद आजही तितकीच प्रभावी आहे. मराठी रंगभूमीवर वादळी ठसा उमटवणारा ‘सखाराम बाइंडर’ यावेळी नव्या दमात, पण तेंडुलकरांच्या मूळ गाभ्याशी प्रामाणिक राहून, पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीसाठी रंगभूमीवर अवतरणार आहे. सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने हे नाटक सादर होणार आहे.
या नव्या आवृत्तीत सखारामची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे साकारणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नाटकाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या नव्या संचात सयाजी शिंदेसोबत नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे, अभिजीत झुंजारराव हे कलाकार रंगणार आहेत. निर्माते मनोहर जगताप, कार्यकारी निर्माते निखिल जाधव, संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत, वेशभूषा तृप्ती झुंजारराव आणि सहाय्यक संकेत गुरव अशी या नाट्यमंडळींची फळी सजली आहे.
रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रयत्न – सयाजी शिंदे
सयाजी शिंदे यांनी या नाटकाबद्दल बोलताना सांगितले की, ” हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. आजच्या पिढीने हे नाटक पाहिलेले नाही, त्यामुळे त्यांना हा ठेवा दाखवण्याचा आणि पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.”
हे नाटक सादर करणे आमच्यासाठी जबाबदारी – नाटकाचे दिग्दर्शक
नाटकाचे दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनीही ही एक जबाबदारीची बाब असल्याचं नमूद केले. तेंडुलकरांच्या लेखनाला कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन नव्या संचात हे नाटक करण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे ते म्हणाले. आजच्या पिढीला विजय तेंडुलकरांची श्रेष्ठता समजावी यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आजच्या पिढीसाठी हे नाटक आणताना नाटककार विजय तेंडुलकरांचे नेमकं म्हणणं काय होतं? हे सांगताना सगळ्या शक्यतांचा विचार करून त्या म्हणण्याच्या जवळ जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. दिग्दर्शन लोकाभिमुख ठेवत, सर्व शक्यतांचा विचार करून आम्ही हे नाटक सादर करतो आहोत, असेही अभिजीत झुंजारराव म्हणाले.
दरम्यान, या नव्या आवृत्तीतून एकीकडे अनुभवी प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, तर दुसरीकडे तरुण पिढीला मराठी रंगभूमीवरील या वादळी, ठसठशीत आणि प्रभावी कलाकृतीचा पहिल्यांदाच थेट अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.