‘वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन’ ही भारतात ट्रेन प्रवासासाठी जलदगतीने धावणारी आणि अतिशय आरामदायक ट्रेन म्हणून गणली जाते. भारतात हळूहळू अनेक मार्गांवर ही ट्रेन सुरू होत आहे. छत्तीसगडमधील दुर्ग शहरातून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरादरम्यान आता लवकरच वंदे मातरम एक्स्प्रेस ट्रेन धावणार आहे. मात्र या ट्रेनच्या अधिकृत उदघाटनाच्या दोन दिवस आधी चाचणीदरम्यान काही लोकांनी या ट्रेनवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दुर्ग ते विशाखापट्टणम दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी सुरू होती. शुक्रवारी रात्री विशाखापट्टनमहून दुर्गकडे जाताना छत्तीसगडच्या बागबहरा (जिल्हा महासमुंद) रेल्वे स्थानकातून ही ट्रेन धावत असताना दगडफेकीची घटना घडली असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे (महासमुंद) निरीक्षक प्रवीण सिंह धाकड यांनी सांगितले. या घटनेत वंदे भारत ट्रेनच्या तीन डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहे. दगडफेक करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दुर्ग-विशाखापट्टनम ‘वंदे भारत ट्रेन’ला १७ सप्टेंबर रोजी दुर्ग येथे हिरवा झेंडा दाखवणार आहे.