औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण येथे एका महिलेने अडीच वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारकीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात पती व सासऱ्याविरुध्द आत्महत्येस प
.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण येथे ज्ञानेश्वर उर्फ भाऊराव मुकाडे याचा त्याची पत्नी सीमा भाऊराव मुकाडे (25) यांच्यासोबत शनिवारी (26 एप्रिल) किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादामध्ये ज्ञानेश्वर याने सीमा यांच्यावर आरोप करून त्यांचा मानसिक छळ केला.
प्रकारानंतर सीमा यांनी त्यांची अडीच वर्षांची मुलगी आरती हिला सोबत घेतले. त्या दोघी विहिरीवर पाणी आणण्याच्या बहाण्याने गेल्या. त्यानंतर सीमा यांनी आरतीला सोबत घेऊन विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन दोघींचे मृतदेह विहीरी बाहेर काढले. त्यांच्यावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर दोघींवर जामगव्हाण येथे रविवारी ता. 27 एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणात संगिता रिठे यांनी सोमवारी (28 एप्रिल) रात्री औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यामध्ये मयत सीमा यांचा पती भाऊराव मुकाडे व सासरा डिगांबर मुकाडे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक शेख खुद्दूस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.