योगेश खरे, झी 24 तास, नाशिक : धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन पासेसच्या काळाबाजाराचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला अनेक भाविक जात असतात. भाविकांचे हे प्रतिष्ठीत श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी व्हीआयपी पासवरुन काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे. एका पासकरिता 2 हजार रुपये आकारल्याची माहिती मिळाली. पण हे पासेस बनावट असल्याचे समोर आले.
सहाशे रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल दोन हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी संशयित नारायण मुर्तडक याच्या विरोधात ठकबाजीचा गुन्हा नोंदवला आहे. सुरतचे चिराग दालिया आणि काही भाविक मार्च महिन्यात त्र्यंबकेश्वरला आले असताना त्यांची फसवणूक झाली आहे.. एका अनोळखी व्यक्तीने त्यांना दिलेल्या पासेससाठी दोन हजार रुपये घेतले मात्र ही तिकिटे मंदिरातल्या यंत्रावर स्कॅन झाली नाही त्यामुळे हा घोटाळा समोर आला आहे.
या अगोदरही झी 24 तासकडून मंदिरातील घोटाळ्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं होतं. मंदिरात सध्या एजंटकडून VIP दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप केला काही भाविकांनी केला आहे. प्रचंड गर्दी असल्यामुळे काही लोक या गर्दीतून वेळ वाचवण्यासाठी तत्काळ देवदर्शन मिळावं अशी अनेक भाविकांची इच्छा असते. मात्र, भोळ्या भाविकांची हिच अति घाई हेरून मंदीर परिसरात एजंट्सचा सुळसुळाट झालाय. जलद दर्शन घडवून देतो, असं सांगत एजंट भाविकांकडून हजारो रूपये लुटतात, असं येथे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलंय.
खास करून परराज्यातील भाविकांना हे एजंट आपलं लक्ष्य करतात आणि लुबाडतात. या जलद दर्शनासाठी 1 हजार ते 4 हजार रुपये फी घेत असल्याचं भाविकांनी सांगितलं. अशा पद्धतीने नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये जर भाविकांची फसवणूक होत असेल तर ते धोकादायक आहे.