Maharashtra Weather News : केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यासह देशभरातील हवामानामध्ये बदल होणार असून, देशातील काही राज्यांना पावसाचा तडाखा बसणार आहे. पुढील 48 तासांमध्ये उत्तर पूर्व भारतामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहतील. तर, हिमालयाच्या क्षेत्रामध्ये पश्चिमी झंझावात अतिशय तीव्र होत असल्या कारणानंसुद्धा हवामानात सातत्यपूर्ण बदल होताना दिसतील.
महाराष्ट्रात कुठं देण्यात आलाय अवकाळीचा इशारा?
राज्यात सातत्यानं तापमानवाढ होत असतानाच दुसरीकडे एकीकडे विदर्भात मात्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्याच्या घडीला दक्षिण मध्य प्रदेश आणि नजीकच्या परिसरावर समुद्र सपाटीपासून साधारण 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीमुळं त्यापासून विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटक इथपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून परिणामस्वरुप विदर्भात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
विदर्भच नव्हे तर राज्याच्या इतरही भागांमध्ये पावसाचा अंदाज इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, जालना हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी, शनिवारी उष्ण व दमट वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईतील तापमानात घट, दिलासा मात्र नाही…
मुंबईच्या तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आली असली तरीही ही घट फारसा दिलासा देत नाहीय. शहरात आणि राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये वाढत्या आर्द्रतेमुळे उष्मा कायम किंबहुना वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर पुढील तीन – चार दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार नसला तरीही आर्द्रतेचं प्रमाण मात्र अधिक असल्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून इतक्यात सुटका नाही असं सांगितलं जात आहे.