डोंबिवलीमध्ये इंग्रजीत ‘Excuse Me’ बोलल्याने दोन महिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पुनम अंकीत गुप्ता या महिलेला इंग्रजीत बोलल्याने मराठीत बोला असे सांगत मारहाण करण्यात आली. यावेळी तिच्यासह तिची मैत्रीणही होती. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात दोन्ही महिलांच्या वेगवेगळ्या तक्रारी घेत तिघांविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
जुने डोंबिवली येथील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पुनम अंकीत गुप्ता सोमवारी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसोबत घराकडे परतत होत्या. यादरम्यान बिल्डिंगबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या काही जणांना बाजूला होण्यासाठी त्यांनी “Excuse me” असं इंग्रजीत म्हटलं. यावरुन तिथे उभे असलेले अनिल पवार, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढ़बाले व त्यांचे काही साथीदार संतापले.
“इंग्रजी नाही, मराठीत बोला”, म्हणत पूनम आणि त्यांच्या मैत्रिणीला बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे तर या गोंधळात पुनम यांचा नवरा आणि दुसरी मैत्रीण तिथे मदतीला आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे