पुण्यातील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग येथील वसतिगृह मैदानावरून ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ झाला. केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, शिवरायांनी देशाच्या स्वाभिमानासाठी लढण्याचा आणि आदर्श शासन चालवण्याचा वारसा दिला आहे. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आदर्श लोकशाही व्यवस्था निर्माण केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, मुघलांच्या काळात अनेक राजे मांडलिकत्व स्वीकारत असताना, माता जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले.
शिवरायांनी केवळ लढाईच नाही तर उत्तम प्रशासनाचेही धडे दिले. त्यांनी शेतकरी कल्याण, जलसंवर्धन, जंगल संवर्धन, गड-किल्ल्यांचे निर्माण आणि आरमार उभारणी यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांवर भर दिला.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.