कल्याणमधील मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला पिस्तुल होते असा दावा फिर्यादी अभिजीत देशमुख यांनी केला आहे. तर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो तेव्हा लांडगे नावाच्या पोलिसांने त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
.
दरम्यान अखिलेश शुक्ला याने कोणताही अधिकार नसताना गाडीवर अंबरदिवा वापरल्यामुळे दिवा जप्त करून अखिलेश शुक्लाच्या गाडीचा ताबा घेण्यात आला आहे. इन्शुरन्स आणि पीयूसी संपला असतानाही ही गाडी गेली चार वर्ष रस्त्यावर धावत आहे. त्याचप्रमाणे अधिकार नसतानाही बेकायदेशीर रित्या या गाडीमध्ये अंबर दिवा लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल
मराठी माणसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत बेदम मारहाण करणाऱ्या कल्याणमधील अखिलेश शुक्ला या एमटीडीसीच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून अवघ्या काही तासांतच कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला टिटवाळा येथून अटक केली. यापूर्वी या घटनेत सुमीत जाधव (23) आणि रंगा ऊर्फ दर्शन बोराडे (22) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या मारहाण प्रकरणात आठ ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे. दरम्यान, मारहाणीत गंभीर जखमी झालेले अभिजित देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने 8 टाके पडले आहेत. त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र कल्याणच्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले.
अखिलेश शुक्लाचे स्पष्टीकरण आधी पत्नीवर हल्ला
अखिलेश शुक्लाचे स्पष्टीकरण आधी पत्नीवर हल्ला झाला. अखिलेश शुक्ला याने पोलिसांना स्वाधीन होण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून स्पष्टीकरण दिले आहे. एक वर्षापूर्वी मी घरात इंटेरियर केले. त्या वेळी शूज रॅक केले. ते बाहेर लावले होते. त्याला देशमुख कुटुंबाने हरकत घेतली होती. त्यावरून ते एक वर्षापासून माझ्या पत्नीला त्रास देत होते. आमच्या जुन्या शेजारच्या वादाला भाषेचा मुद्दा बनवण्यात आला. कळवीकट्टे यांनी धूप लावण्यास पत्नीला विरोध केला होता त्यावरून वाद झाला. या वेळी देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेत भांडण केले. माझ्या पत्नीला केसांनी पकडून त्यांनी मारहाण केली असा आरोप शुक्ला यांनी या व्हिडिओतून केला आहे. आधी माझ्या पत्नीवर हल्ला झाला, त्यानंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी मला वाचवले. आमची पाचवी पिढी महाराष्ट्रात राहते. मात्र या प्रकरणाला वेगळेच वळण लावल्याचे शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
धूपबत्तीवरून सुरू झालेला वाद गेला हाणामारीपर्यंत
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीत अखिलेश शुक्ला, लता कळवीकट्टे आणि अभिजित देशमुख हे शेजारीच राहतात. नेहमीप्रमाणे शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावतात. या धुपाचा प्रचंड धूर होऊन तो शेजारच्या कळवीकट्टे यांच्या घरात जायचा. या धुराचा त्रास त्यांच्या तीन वर्षांच्या बाळाला व्हायचा. तसेच वृद्ध आईलाही दम लागायचा. यावरून वाद झाला.‘तुम्ही मराठी घाण आहात. तुमचा वास येतो. तुम्ही मांसमच्छी खाणारे आहात. तुमच्यासारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत,’ अशी शेरेबाजी केली. या वेळी शेजारील अभिजित देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बाहेरून माणसे बोलावून मारहाण केली.
पोलिसांच्या तपासासाठी चार टीम- अतुल झेंडे
कल्याण पोलिस परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, या घटनेतील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला टिटवाळा शहाड येथून पोलिसांनी अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. शुक्ला यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओची ही पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. या प्रकरणाच्या तपासासाठी चार टीम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच जखमी अभिजित देशमुख यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.