पूर्ण बहुमत मिळूनही महायुतीमध्ये नाराजीचे सत्र सुरूच आहे. भाजपचे राम शिंदे यांना विधान परिषदेचे सभापतिपद दिल्याने शिंदेसेनेच्या नीलम गोऱ्हे (उपसभापती) आणि भाजपचे प्रवीण दरेकर नाराज झाले. ते खासगीत काही जणांजवळ आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
.
१९ डिसेंबर रोजी सभापतिपदाची निवडणूक होत आहे. गोऱ्हे यांना सभापती करण्यासाठी एकनाथ शिंदे सक्रिय होते. शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने राम शिंदे यांना सभापती करा, असे म्हटले होते. पण एकनाथ शिंदेंच्या विरोधामुळे भाजपने माघार घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या दरेकरांना मंत्री किंवा सभापतिपद मिळेल अशी आशा होती.
अर्ज दाखल करताना एकनाथ शिंदे गैरहजर
राम शिंदे यांनी बुधवारी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या वेळी शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंतही उपस्थित होते, मात्र उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर होते.