महायुतीचा सरकार स्थापन करण्याचा तिढा अद्याप सुटला नाही. भाजपने सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरचा मुहूर्त काढला आहे. पण महायुतीला या सरकारचे नेतृत्व कोण करणार? याविषयीची उत्कंठा अद्याप संपली नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवा
.
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली. त्यानंतर 23 तारखेला निकाल लागला. त्यात सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. पण यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महायुतीच्या सरकारच्या संभाव्य खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवेळी अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्या वाट्याला 9 मंत्रीपदे आली होती. यावेळी ही त्यांना एवढीच मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आजच्या बैठकीत अमित शहांसोबतच्या बैठकीत आणखी एखाद-दोन मंत्रिपदासाठी आग्रह धरतील अशी माहिती आहे.
एकनाथ शिंदेंच्या सर्वच बैठका रद्द
दुसरीकडे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरातील आपल्या सर्वच बैठका रद्द केल्या आहेत. शिंदे यांनी आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. पण ही बैठक पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या अजेंड्यावरील इतरही कामकाज रद्द करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे सध्या आजारी आहेत. डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांचे आजचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. यात महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे आज ठाणे येथील आपल्या निवासस्थानीच असणार आहेत.
फडणवीसांच्या बंगल्यावरील हालचालींत वाढ
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील हालचालींत मोठी वाढ झाली आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीत असणारे अनेक नेते या ठिकाणी येऊन फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ या सागर बंगल्यावर पोहोचल्यात. हे चारही नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती आहे.