शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठे विधान केले आहे. मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो, असे एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते, असे भरत गोगावले यांनी सांगितले. परंतु, आमची चर्चा सुरू असताना आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह केला. त
.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस उलटले, तरी अद्याप सरकारस्थापनेवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, भाजपचा मुख्यमंत्री करायचा असेल, तर माझी काही अडथळा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना विराम मिळाला आहे. त्यातच आता भरत गोगावले यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय शिंदेंवर भरत गोगावले म्हणाले. आमची चर्चा सुरू असताना मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. परंतु, आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह केला. त्यावर मी 2 दिवस गावी जाऊन येतो. मला थोडे निवांत राहुन विचार करू द्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. तर उपमुख्यमंत्री कोण होणार या संदर्भातील सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील. सत्तेच्या प्रक्रियेत एकनाथ शिंदे सहभागी व्हावे हेच आम्हाला वाटते, असे गोगावले यांनी सांगितले.
संख्याबळ कमी असताना हट्ट धरणे स्वभावात नाही भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवरही भाष्य केले. आमच्या तिनही पक्षात कटुता नाही. भाजपचे संख्याबळ जास्त आहे. एवढी आमदार असताना हट्ट धरणे आमचा स्वभाव नाही. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री करण्यास आमची काही हरकत नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाराजीच्या चर्चेला अर्थ नाही. राजकारणात कधी काय घडेल, हे कुणी सांगू शकत नाही, असे भरत गोगावले म्हणाले.
सर्वांना विश्वासात घेऊनच शपथविधी भरत गोगावले यांनी शपथविधीवरही भाष्य केले. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा त्यांनी शपथविधी कधी करायचा हे ठरवणे गरजेचे असते, विश्वासात न घेता शपथविधी घेतला जातोय हे म्हणणे बरोबर नाही, असे ते म्हणाले. दिल्लीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अमित शाह, जे.पी. नड्डा यांची बैठक झाली. त्या बैठकीत काही तरी ठरल्याशिवाय अशी तारीख दिली जाणार नाही. 5 डिसेंबरला शपथविधी होणार असून त्याची तयारी देखील आझाद मैदानावर सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे सगळे होत आहे, कुणाला बाहेर ठेवले जात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.