राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ईव्हीएम अर्थात मतदान यंत्रात घोटाळा झाल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या जास्त जागा निवडून आल्याचा दावा केला आहे. ईव्हीएम हॅक करता येते हे मी स्वतः इंजिनिअर असल्यामुळे ठामपणे सांगू शकतो, असे ते म्हणालेत.
.
महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर समाधान मानावे लागले. याऊलट महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक 20, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अनुक्रमे 16 व 10 जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी उपरोक्त आरोप केला आहे.
अनेक मतदारसंघात ईव्हीएमचा घोटाळा झाला
महादेव जानकर म्हणाले, राज्यातील अनेक मतदारसंघांत ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. यामुळे महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. ईव्हीएम हॅक करता येते. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो. आमचा ईव्हीएमला विरोध आहे. मतदान यंत्रामुळे देशाची लोकशाही संकटात सापडली आहे. सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोग सर्वकाही त्यांचेच आहे. याला लोकशाही म्हणता येत नाही. देशात लोकशाहीचा खून करण्याचे काम झाले आहे. त्यामुळे आम्ही देशभरात याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीचा आम्हाला अत्यंत वाईट अनुभव आला. त्यामुळे मी त्यांच्यापासून दूर झालो. आम्ही काँग्रेसचा अद्याप अनुभव घेतला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्रपणे मार्गक्रमण करण्याची आमची भूमिका आहे.
ते पुढे म्हणाले, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कुणाची निवड करायची हे त्यांचे ते ठरवतील. पण एवढे यश मिळूनही महायुतीला निर्णय घेता येत नसेल तर मी काय बोलणार? भाजप कुणाला सरप्राईज मुख्यमंत्री करेल? यात मला पडायचे नाही. पण मला स्वतः महायुतीचा फार वाईट अनुभव आला. त्यामुळे आमच्या पक्षाने स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्णय घेतला.
आमदार गुट्टेंवर कारवाई करण्याचे संकेत
महादेव जानकर यांनी यावेळी रासपचे गंगाखेडचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर कारवाई करण्याचेही संकेत दिले. ते म्हणाले, माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे. आम्ही या कुणासोबत जायचे याचा निर्णय अद्याप घेतला नाही. पण त्यांनी पक्षाला विश्वासात न घेता एखादा निर्णय घेतला तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. मला सर्व गोष्टींच्या ठेचा लागल्या आहेत. त्यामुळे मी सर्व गोष्टी माझ्या ताब्यात ठेवल्या आहेत. माझा एक आमदार असला तरी त्याला पक्षावर दावा सांगता येणार नाही, असे ते याविषयी बोलताना म्हणाले.
शरद पवारांनाही ईव्हीएमवर संशय
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे प्रझेंटेशन काही लोकांनी आम्हाला दिले. आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल, असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण निकालानंतर आता त्यात तथ्य दिसत आहे. राज्यातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे. पण त्यातून काही साध्य होईल का? याविषयी मला शंका वाटते.