महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर राज्यात तत्काळ सरकार स्थापन होईल असा दावा केला जात होता. पण आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीमुळे अद्याप सरकार स्थाप
.
महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे साहजिकच शिंदे यांच्या ताब्यातील मुख्यमंत्रीपद भाजपच्या दिशेने गेले. आता भाजपने या पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या नाराजीमुळेच राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नसल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातील हालचालींत मोठी वाढ झाली आहे.
अमित शहा राज्यातील नेत्यांशी संवाद साधणार
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकार स्थापन करण्याचा तिढा अद्याप सुटला नसल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. यामुळे आता दिल्लीतून चक्रे फिरवली जात आहेत. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच राज्यातील नेत्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यात सरकार स्थापनेपूर्वी व नंतर कोणती काळजी घ्यायची यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. भाजप आमदारांची येत्या 2 किंवा 3 डिसेंबर रोजी गटनेता निवडण्यासाठी बैठक होणार असल्याचीही माहिती आहे. त्यानंतर 5 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होईल. या शपथविधीला सर्वच आमदारांना हजर राहण्याचेही निर्देश देण्यात आलेत.
देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ लागले बॅनरबाजी
महायुतीने आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची अद्याप घोषणा केली नाही. पण या प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. महायुतीकडून तेच 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा दावा केला जात आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावलेत. या बॅनरवर फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसून येत आहेत. त्यावर राज तिलक की करो तयारी असा मजकूरही लिहिण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट केले नसले तरी फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे.