वसमत विधानसभा मतदार संघात निवडणुक प्रशिक्षणासाठी गैरहजर असलेल्या 35 कर्मचाऱ्यांना नोटीस बाजवण्यात आल्या असून त्यांना तात्काळ खुलासा करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विकास माने मंगळवारी ता. 12 दिले आहेत.
.
हिंगोली जिल्हयात तीन विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक प्रक्रिया घेतली जात आहे. मतदानाची तारीख तोंडावर आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भाेसले, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थितीत आढावा बैठका घेतल्या जात आहेत. त्यामध्ये मतदान प्रक्रिया, मतदान केंद्रावरील सुविधा, पोलिस बंदोबस्त याचा आढावा घेतला जात असून आवश्यक त्या ठिकाणी सुचनाही दिल्या जात आहेत.
दरम्यान, मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे तीन विधानसभा मतदार संघात दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी माने, प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या ठिकाणी हजेरी लाऊन पाहणी केली आहे. यावेळी टपाली मतदान देखील घेण्यात आले आहे.
दरम्यान, वसमत विधानसभा मतदार संघात सुरमणी दत्ता चौघुले नाट्यगृह आणि बहिर्जी स्मारक विद्यालयात घेण्यात आले. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या मतदान केंद्राध्यक्ष सहा, मतदान अधिकारी तीन, इतर मतदान अधिकारी 5 तर इतर 21 महिला अधिकारी असे 35 कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आलेआहे. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वेळेत खुलासा सादर न केल्यास प्रशासकिय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे