महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत



मुंबई – विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. त्यात अद्याप महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झाले नाही. मात्र इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात तयारीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत २६० जागांवर तिन्ही पक्षाचे एकमत झालं असलं तरी उर्वरित २८ जागांवरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यात महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष वगळता इतर मित्र पक्षांनाही सामावून घ्यावे लागणार असल्याने मविआत जागावाटपावरून कुरघोडी सुरू आहे.

सांगोला मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचा आहे, त्याठिकाणी मविआत ही जागा ठाकरेंच्या वाट्याला जाणार आहे. परंतु तिथे शेतकरी कामगार पक्षाने दावा केला आहे. शेकापकडून या मतदारसंघात निवडणुकीची तयारीही केली जात आहे. मात्र त्यातच ठाकरेंनी सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आलेले दीपक आबा साळुंखे यांना पक्षप्रवेश दिला आहे. त्यामुळे सांगोला मतदारसंघात दीपक आबा मशाल चिन्हावर उभे राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे नाराज शेकाप नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांच्या रुपाने शेकापने ६० वर्ष नेतृत्व केले आहे. त्यामुळे इथं शेकाप उमेदवार अनिकेत देशमुख विधानसभा लढण्याची तयारी करत आहेत. मात्र ठाकरेंकडून ही जागा सोडण्यास नकार देण्यात आला आहे.

काँग्रेस-ठाकरे गटात वादंग

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपासाठी मविआ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मात्र काही जागांवर जोरदार चुरस आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला. आता वेळ खूप झालाय. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. वारंवार त्यांना दिल्लीत यादी पाठवावी लागते, मग चर्चा होते. आता ही वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय व्हावा असं आम्हाला वाटतं. राष्ट्रवादी आणि आमच्यात मतभेद नाहीत. काँग्रेससोबतही नाही. परंतु काही जागा आहेत ज्यावर तिन्ही पक्षांचा दावा आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांशी मी बोलणार आहे असं राऊतांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊतांचे नेते उद्धव ठाकरे आहेत, जितेंद्र आव्हा़ड, जयंत पाटील यांना त्यांचे नेते शरद पवार यांना माहिती द्यावी लागते. परंतु आमची नेमणूक जी केलीय ती मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी केली आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांना माहिती द्यावी लागते. हायकमांड बसून हे निर्णय घेतील. त्यामुळे संजय राऊतांचं म्हणणं नेमकं मला कळलं नाही त्यावर मी बोलणार नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.   

Web Title: Shetkari Kamgar Paksh will leave the MVA alliance Controversy over seat sharing in Maha Vikas Aghadi Congress, Uddhav Thackeray, NCP Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24