प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण, तरुणाने नैराश्यातून राजमाची दरीत उडी घेतली, ‘त्या’ व्हिडिओमुळं उकललं गूढ


Pune Crime News: चाकण मधील 27 वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती या तरुणाचा मृतदेह तब्बल 370 फूट खोल दरीत आढळला आहे. धक्कादायक म्हणजे सूर्यकांतने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवला होता. याच व्हिडिओद्वारे आणि लोकेशन वरून लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन बाहेर काढला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत प्रजापती या 27 वर्षीय तरुणाचं चाकणमधील तरुणीबरोबर प्रेमप्रकरण सुरू होतं. प्रियकर सूर्यकांतला त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय होता. याच संशयामुळे नैराश्यात असलेला सूर्यकांत 9 ऑक्टोबर रोजी घर सोडून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सुर्यकांत दुसऱ्या दिवशीही घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी चाकण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर सूर्यकांतचं शेवटचं लोकेशन हे लोणावळा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. सूर्यकांतला शोधण्याचं मोठं आव्हान पोलीस आणि शिवदुर्गच्या पथकापुढे होतं. लोणावळा शिवदुर्ग पथकदेखील यावरून लोकेशनची जुळवाजुळव करत होतं. अखेर तो व्हिडिओ राजमाची येथील असल्याचं समोर आलं. व्हिडीओमध्ये पाठीमागे दिसत असलेला भाग तिथला असल्याचं स्पष्ट झालं. अखेर पुन्हा शोध मोहीम सुरू केली. 

दरीत काही फुटांवर सूर्यकांतचा मोबाईल दिसला. आणखी खाली गेल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी आली. मृतदेह त्याचा असल्याचं निश्चित झालं. राजमाची दरीत तब्बल 370 फुटांवर सूर्यकांतचा मृतदेह आढळला. सात दिवसांनंतर सूर्यकांतचा शोध लागला होता. प्रेम प्रकरणातून सूर्यकांतने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शिवदुर्गचे सुनील गायकवाड यांच्या पथकाने त्याचा मृतदेह शोधला.सूर्यकांतने उचललेले पाऊल त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर, परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. मात्र, अशा प्रकारे प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा तरुणाची मानसिक स्थिती आणि नैराश्य यांचा गांभीर्याने विचार करायला हवा, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. 

बोपदेव घाट आरोपींची डिएनए चाचणी होणार 

दरम्यान, पुणे बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख याची डीएनए चाचणी केली जाणार आहे. शेख याचे रक्त, नखे, तसेच थुंकीचे नमुने न्याय वैद्याक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या प्रकरणात अटक आरोपींकडून सखोल चौकशी आणि पुढील तपासासाठी२२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश काल न्यायालयाने दिले आहेत. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24