एखाद्या व्यक्तीमध्ये दैवी शक्ती असेपर्यंत किंवा त्याच्यावर एखाद्या अदृश्य शक्तीचा प्रभाव असेपर्यंत कोणताही व्यक्ती सलग 10 हजार किलोमीटर चालूच शकत नाही, असा दावा काँग्रेस सरचिटणीस अविनाश पांडे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर वाद होण्याची शक्यता
.
अविनाश पांडे यांनी नागपूर येथे आयोजित डॉक्टर झाकीर हुसेन विचार मंचाच्या एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी देशातील स्थिती पाहून थेट जनतेच्या दरबारात जाण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. एखाद्या व्यक्तीत दैवी शकत असत नाही किंवा त्याच्यावर एखाद्या अदृश्य शक्तीचा प्रभाव असत नाही तोपर्यंत कोणताही व्यक्ती असे करू शकत नाही.
कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा राहुल गांधी यांनी केली. त्यांनी आपले वैयक्तिक आरोग्य व सुरक्षेची कोणतीही काळजी केली नाही. त्यांनी 10 हजार किलोमीटरची पायपीट केली. लोकांचे दुःख जाणून घेतले. त्यांच्या पदयात्रेमुळे देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काढली होती. ही यात्रा त्यांनी पायी काढली होती. त्यानंतर त्यांनी भारत जोडो न्याय यात्राही मणिपूरपासून मुंबईपर्यंत काढली होती. या यात्रेचा काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा झाला.
राहुल गांधींनी साधला होता मोदींवर निशाणा
दुसरीकडे, राहुल गांधी यांनी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते, तुम्ही एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना हात जोडले, तर तुम्हाला संविधानाचे संरक्षण करावेच लागेल. संविधानाला विरोध करणारी विचारधारा फार जुनी आहे. त्यांच्यावेळीही हाच संघर्ष सुरू होता. त्यांच्या राज्याभिषेकावेळी याच विचारधारेने विरोध केला. ही नवी गोष्ट नाही. ही हजारो वर्षे जुनी लढाई आहे. शिवाजी महाराज याच विचारधारेविरोधात लढत होते. काँग्रेसही आज त्याविरोधात संघर्ष करत आहे.
कुणाचीही नियत केव्हाही लपत नाही. त्यांनी (भाजप) शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि काही दिवसांतच तो पुतळा पडला. त्यांचा हेतू चुकीचा होता. त्यामुळे पुतळ्याने त्यांना संदेश दिला की, तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असाल तर तुम्हाला त्यांच्या विचारांचे संरक्षण करावेच लागेल. यामुळेच तो पुतळा पडला. कारण, त्यांची विचारधारा चुकीची आहे. ते समोरून येऊन हात जोडतात आणि नंतर 24 तास त्यांच्या विचारधारेविरोधात काम करतात, असे राहुल गांधी म्हणाले होते.