नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
नाशिक येथे तब्बल 4 कोटी 68 लाख खर्चून बांधलेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक वादात सापडले आहे. स्मारकातील शिलालेखावरून महात्मा फुले यांच्या अखंडातील ‘वित्ताविना शूद्र खचले’ ही ओळ गायब केलीय, तर एका ओळीत सोयीनुसार बदल केलेत.
.
काँग्रेसने या प्रकरणी तीव्र शब्दांत निषेध नोंदवलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपने महापुरुषांचा ठरवून अपमान केला. सरकारचे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवरचे बेगडी प्रेम उघड झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या वादानंतर नाशिक महापालिकेने शिलालेख दुरुस्तीचे काम सुरू केल्याचे समजते.

नाशिकमधील फुले स्मारकातील शिलालेख.
नेमके प्रकरण काय? नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भारतातील सर्वात मोठे अर्धाकृती ब्राँझ धातूचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे लोकार्पण 28 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित झाले. मात्र, हेच स्मारक आता वादात सापडलेय. स्मारक परिसरात महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथालल्या अखंडातील काही ओळी शिलालेखावर आहेत.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले!
फुले यांच्या या मूळ ओळी आहेत. मात्र, यातील ‘वित्ताविना शूद्र खचले’ ही ओळच शिलालेखावरून गायब आहे, तर ‘गतीविना वित्त गेले’ या ओळीतही बदल केला गेला. त्याऐवजी ‘गतीविना वित्त खचले’ अशा ओळी शिलालेखावर टाकल्यात. हे बदल केल्यामुळे बहुजनांचा इतिहास पुसला गेला, असा आरोप होतोय.

विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर पोस्ट लिहून सरकारवर आरोप केलेत.
फुले यांचे विचार अमान्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकातील शिलालेखात बदल केल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट टाकून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात की, ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले!’ महात्मा ज्योतिबा फुले यांनी या सहा ओळींमधून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या संदेशानंतर समाजात बदल घडला. त्याचा परिणाम आज दिसून येत आहे. राज्यातील महायुती सरकारला महात्मा फुले यांचे हे विचार मान्य नाहीत, असाच प्रश्न पडायला लागला आहे.

फुले स्मारकाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती लोकार्पण झाले होते.
जाणीवपू्र्वक केला बदल विजय वडेट्टीवार पुढे म्हणतात की, आता हेच बघा नाशिक येथे नुकतेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई यांच्या स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले. या स्मारकावर महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या ओळी अंकित करण्यात आल्या. पण, आपल्या सोयीनुसार काही ओळी जाणीवपूर्वक वगळल्या. काहींमध्ये सोयीचा बदल केला. ‘वित्ताविना शूद्र खचले’ ही ओळच वगळण्यात आली. तर ‘गतीविना वित्त गेले’ ही ओळ बदलून ‘गती विना वित्त खचले’ अशी करण्यात आली.
बेगडी प्रेम उघड विजय वडेट्टीवार पुढे म्हणतात की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे लिहिले त्यातून काही ओळी वगळण्याचा, बदलण्याचा अधिकार या सरकारला कुणी दिला? देशाचे संविधान असो की महापुरुषांचे लेखन…ते आपल्या सोयीनुसार बदलून घेणे हा भाजप आणि मित्रपक्षांचा अजेंडाच आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत भाजपने ठरवून महापुरुषांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आता नाशिकमधली ही छेडखानी. सततच्या या घटनांमुळे या सरकारचे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवरचे बेगडी प्रेम उघड झाले आहे. जनतेला यांचा डाव कळून चुकला आहे.

नाशिकमधील फुले स्मारक लोकार्पणावेळी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
कसे आहे स्मारक? नाशिकमध्ये सुमारे 2710 मीटर जागेवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारले गेले आहे. स्मारकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याची उंची 18 फूट, तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची उंची 16.50 फूट असून, पुतळा परिसरातील विशेष प्रकाश योजना लक्ष वेधते. स्मारकातील विद्युत रोशनाईचा वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, अशी विशेष प्रकाश योजना असल्याचे दिसते. स्मारकात सुसज्ज वाहतून बेट, पाण्याचे कारंजे निर्माण केलेत.
स्मारकातील असे…
पुतळ्यांची उंची महात्मा फुले -18 फूट, सावित्रीबाई फुले – 16.50 फूट पुतळ्याचीं रुंदी – प्रत्येकी 14 फूट
पुतळ्याचे वजन महात्मा फुले यांचा पुतळा- 8 टन सावित्रीबाई फुले यांचा पुतळा- 7 टन धातू – ब्रॉन्झ
पुतळ्याची निर्मिती – मूर्तिकार – बाळकृष्ण पांचाळ – निर्मिती – कुडाळ, रत्नागिरी – पुतळे बनविण्याचा कालावधी – 11 महिने – पुतळ्यांचा खर्च – 4 कोटी 68 लाख
कसा बसवला? – पुतळा अतिशय भक्कम केला – काँक्रीटचा 8 फूट चौथरा उभा केला – चौथऱ्याला ग्रेनाइट लावण्यात आले – सोबतच 30 ते 40 फूट पाइल फाऊंडेशन केले