आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची श्रृंखला सुरु झाली असून गेल्या दोन दिवसांत १०८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतच्या विविध टप्प्यांचे धड
.
जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या दोन दिवसीया प्रशिक्षणानंतर सर्व अधिकारी, कर्मचारी जिल्हास्तरावरील सधन व्यक्ती बनले असून आता ते तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या निर्देशानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे व याच विभागाचे नायब तहसिलदार प्रवीण देशमुख यांनी या शिबिराचे आयोजन केले.
शिबिरात राज्यस्तरीय साधन व्यक्ती म्हणून अकोल्याचे एसडीओ शरद जावळे, अकोटचे एसडीओ मनोज लोणारकर, दर्यापुरचे तहसीलदार रवींद्र कानडजे, बुलडाण्याचे एसडीओ शैलेश काळे आणि अचलपुरचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी वेगवेगळ्या विषयांची मांडणी केली. वेगवेगळ्या पाच टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारी अर्जाची वैधता व अवैधता, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आणि चिन्ह वाटप, मतदान केंद्राची रचना व संवेदनशील मतदान केंद्रांचे व्यवस्थापन, निवडणुकीची आचारसंहिता, उमेदवारांच्या खर्चाचा लेखा-ृजोखा, प्रसार माध्यमांकडून उघड केल्या जाणाऱ्या तक्रारी, एमसीएमसी चे कामकाज, मतदार यादीची सुसूत्रता, ‘स्वीप’ अभियानांतर्गतचे उपक्रम, इव्हीएम-व्हीव्हीपॅटचे व्यवस्थापन व कामकाज, टपाली मतपत्रिकांचे वितरण, वृध्दांचे घरबसल्या मतदान, मतमोजणी आणि निकालाची घोषणा आदी सर्व विषय शिकविण्यात आले.
तालुका कर्मचाऱ्यांनाही धडे
द्विदिवसीय शिबिराच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती व तिवसा या चार मतदारसंघातील निवडणूकविषयक कर्मचाऱ्यांना धडे देण्यात आले. तर दुपारी दर्यापुर, मेळघाट, अचलपुर आणि मोर्शी मतदारसंघातील नोडल ऑफीसर आणि पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर दुपारी अडीच ते पाच या वेळात जिल्ह्यातील सर्व आठही मतदारसंघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना तांत्रिक आणि डीजीटल माहिती देण्यात आली. त्यासाठी रवींद्र कानडजे यांच्याशिवाय एनआयसीचे मनीष फुलझेले यांनीही मार्गदर्शन केले.