उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सातारा जिल्ह्यातील फलटण विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दीपक चव्हाण यांना देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीतील राज्यातील पहिला उमेदवार ठरल्याचे स्पष्ट झा
.
फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीचे सोमवारी उद्घाटन झाले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. पण काही कारणास्तव त्यांना या कार्यक्रमाला येता आले नाही. परिणामी, त्यांनी फोनवरूनच या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी फलटण विधानसभेची उमेदवारी दीपक चव्हाण यांना देण्याची घोषणा केली.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
अजित पवार म्हणाले, सोळशी हे गाव फलटण विधानसभा मतदारसंघात आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह घेऊन उमेदवारी देणार आहोत. दीपक चव्हाण हे आपल्या पक्षाचे उमेदवार आहेत. तुम्ही त्यांना आपला आशीर्वाद द्या, त्यांना सहकार्य करा. दीपक चव्हाण यांना संधी दिल्यानंतर फलटण व कोरेगावला मी कोट्यवधी रुपयांचा निधी देईन. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. तिकडे गेल्यावर महिला व मायमाऊल्या मला राख्या बांधतात. मी त्यांना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली आहे. आता नवरात्र आहे, पुढे दसरा, दिवाळीही आहे. तेव्हाही मी त्यांना भाऊबीजेची ओवाळणी दिल्याशिवाय राहणार नाही.
…अन् रामराजे नाईक निंबाळकर खदकन हसले
सोळशी येथील कार्यक्रमाला रामराजे नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती होती. अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा ते खदकन हसले. उल्लेखनीय बाब म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. निंबाळकर कुटुंबाने उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. त्यामुळे अजित पवार यांनी फोनवरून दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांना आपल्या चेहऱ्यावरील हास्य लपवता आले नाही.
महाविकास आघाडीत फलटण शरद पवार गटाला
दरम्यान, विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत फलटण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून येथे कुणाला उमेदवारी मिळणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे येथील लढत रंगतदार होईल यात शंका नाही.