India-Pakistan Conflict in the UN: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये उडणारे खटके नवे नाहीत. पण, यावेळी मात्र निमित्त वेगळं आहे. सोशल मीडियावर एका महिला अधिकाऱ्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं त्या पाकिस्तानला खडे बोल सुनावताना दिसत आहेत. दहशतवाद आणि पाकिस्तान या मुद्द्यांवर भाष्य करताना कटकारस्थानं रचणाऱ्या शेजारी राष्ट्राचा खरा चेहरा जगासमोर आणणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांनी मांडलेले मुद्दे पाहता, त्यावर उत्तर देणं पाकिस्तानला जमलंच नाही. पण, संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक मंचावर मर्यादा ओलांडल्यास काय उत्तर मिळतं, हेसुद्धा यामुळं त्यांच्या लक्षात आलं.
भारताच्या वतीनं संयुक्त राष्ट्रंघाच्या महासभेतील जनरल असेंबली (UNGA) येथे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भाषणानंतर शेजारी राष्ट्राला खडसावण्यात आलं. सीमाभागात सुरु असणाऱ्या दहशवादाला पाकिस्ताननं कायम समर्थन दिलं आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील अशा शब्दांत भारताकडून पाकवर टीका करण्यात आली. न सुधारणाऱ्या पाकिस्तानच्या वतीनं पंतप्रधान शरीफ यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा अधोरेखित केला, ज्यावर भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.