शौचास गेलेल्या मुलास बिबट्याने उचलून नेले: जुन्नर तालुक्यातील घटना, ऊसाच्या शेतात आढळला मृतदेह – Pune News



मोकळ्या मैदानात शौचास गेलेल्या एका 9 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेऊन ठार मारल्याची भयंकर घटना जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी गावातील ओझर – लेण्याद्री रस्त्यालगत घडली आहे.

.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, एका वीटभट्टी कामगाराचा 9 वर्षांचा मुलगा रुपेश तानाजी जाधव हा पहाटे 5 च्या सुमारास घराच्या मागील बाजूस शौचास बसला होता. त्यावेळी लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्याच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. त्यावेळेस समोरच असलेल्या मुलाच्या आजोबांनी आरडा – ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्याने आजोबांना न जुमानता मुलाला शेजारच्या उसाच्या शेतामध्ये फरपटत नेत ठार मारले. ही घटना पीडित कुटुंबाच्या घरामागेच घडली. पण विद्युत डीपी जळाल्यामुळे व पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत असल्यामुळे रात्रीच्या अंधारात कुणालाच काही करता आले नाही.

याबाबतची माहिती गावातील नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती वन विभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा शोध सुरु केला. एक ते दिड तासाच्या प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह शेजारच्या उसाच्या शेतात आढळला. सदर शोधकार्य विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व तसेच 30-35 वनकर्मचारी आणि रेस्कु टीम सदस्य यांनी गावातील नागरिकांच्या मदतीने राबविले.

त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे पाठविण्यात आला. याआनुषंगाने घटनास्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच व उपसरपंच व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. सदर ठिकाणी नरभक्षक बिबट्याला पकडण्या करिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 10 पिंजरे लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24