बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या एन्काउंटरमध्ये जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरे यांची शर्मिला ठाकरे यांनी ज्युपिटर रुग्णालयात भेट घेतली. एक महिला म्हणून मला अभ
.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मी या ठिकाणी राज ठाकरेंची पत्नी म्हणून किंवा कोणत्या राजकीय पक्षाची प्रतिनिधी म्हणून बोलत नाही. मी एक महिला म्हणून बोलत आहे. रोज इतके हिंस्त्र गुन्हे घडत आहे. नुसता बलात्कार होत नाही तर, बलात्कारानंतर वाईट पद्धतीने खून होत आहे. त्यामुळे आमच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राजकारणी, विरोधी पक्ष किंवा कोर्ट काय बोलत आहे, याबाबत मला काही पडले नाही. आज मला महिला म्हणून अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसाचे कौतुक करत आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करायची असेल, तर असे एन्काउंटर झाले पाहिजेत.
आपल्याला असा शक्ती कायदा पाहिजे
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, अक्षय शिंदे याच्या विरोधात पोलिस आणि कोर्टाकडे सर्व पुरावे आहेत, असे वकील उज्वल निकम यांनी म्हटले. दोन पीडित लहान मुलींनी त्याला ओळखले आहे. त्यामुळे अक्षय शिंदे याच्या विरोधात पुरावे नाहीत असे होऊच शकत नाही. पण कोर्टातील खटला जितका वेळ चालतो, तितकीच महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढत जाते. दिल्ली येथील प्रकरणात पीडितेला भयंकर अवस्थेत मारले होते. मात्र आरोपींना 6 वर्षांनी शिक्षा मिळते. अशा प्रकरणात त्या माणसांना 6 वर्षांचा जगण्याचा हक्क नाही दिला पाहिजे.
आपण शक्ती कायद्याबाबत नुसती चर्चा करतो. पण आपल्याला एन्काउंटरसारखा शक्ती कायदा पाहिजे. तुम्ही लोकसभा-विधानसभेत हा कायदा पास करा अथवा नका करू, आम्हा महिलांना असा शक्तिकायदा अभिप्रेत आहे, असे म्हणत शर्मिला ठाकरे एन्काउंटरचे समर्थन केले आहे.
…तर पोलिसांनी लावलेला निकाल अतिउत्तम
बलात्कार प्रकरणाचे निकाल एक-दोन महिन्यांत लागायला हवे. ते लांबल्यानंतर पीडितांना आरोपी ओळखणे कठीण होते. बदलापूर प्रकरणातील पीडित मुली खूप लहान आहेत. 6 वर्षांनी त्या आरोपीला ओळखू शकल्या नसत्या. कोर्टात एक-दोन महिन्यांत निकाल लागले तर उत्तमच आहे. आणि नाही लागले तर पोलिसांनी लावलेला निकाल अतिउत्तम आहे, असेही ठाकरे म्हणाल्या.
एन्काउंटरवर प्रश्न विचारणे हा विरोधकांचा मूर्खपणा
महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला पुरक आहेत असे वाटत असेल तर बलात्कार प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर देखील लोकशाहीला पुरक आहे. एन्काउंटरवर प्रश्न विचारणे हा विरोधकांचा मूर्खपणा सुरू आहे. हैद्राबाद एन्काउंटरवर याच विरोधकांनी त्यांच्या वृत्तपत्रात पोलिसांचे कौतुक केले होते. मग हैद्राबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी वेगळा न्याय असे का? असा सवाल ठाकरे यांनी विरोधकांना विचारला आहे.