नाशिक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकारी आणि नेत्यांसामोरच विधानसभा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्य
.
नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी या सभेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी कोंडाजी आव्हाड यांच्याविरोधात खळबळजनक वक्तव्य केले. जिल्हाध्यक्ष कोंडाजी यांना पक्षाचे अध्यक्ष केले तर महाराष्ट्र मुकवतील, अशी टीका गजानन शेलार यांनी केली आहे.
गजानन शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड म्हणाले, मारणाऱ्याचे हात धरू शकतो, बोलणाऱ्याचे तोंड नाही. त्यांना माझ्याबद्दल असे का म्हणायचे होते मला अजूनही समजले नाही. एखाद्याच्या स्वभावाला औषध नसते. अशा स्वरूपाच्या विधानामुळे पक्षवाढीवर परिणाम होतो. आम्ही पक्ष वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्यात रक्ताचे पाणी केले आहे. ज्यांनी अर्ज आणि डीडी दिले होते ते जयंत पाटील आणि पवार साहेब यांच्याकडे दिले आहे. त्यांनी शहराची यादी दिली की नाही हे माहिती नाही, असा पलटवार कोंडजी आव्हाड यांनी केला आहे.
जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्यातील वादाची सारवासारव करण्यासाठी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख मध्ये पडले. मेहबूब शेख म्हणाले, गजानन शेलार स्पष्ट बोलतात, त्यांच्या पोटात जे तेच ओठांवर असते. गजानन शेलार आमदार व्हावेत, अशी आमची इच्छा आहे, असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना मेहबूब शेख यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
मेहबूब शेख म्हणाले, शरद पवार यांच्या सोबत नाशिक जिल्हा अडचणीच्यावेळी ऊब हा आहे. अजित पवार कुठे आहेत? ईडीने सील केलेले प्रफुल्ल पटेल कुठे आहेत? आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत तर ते भाजपमध्ये आहेत. गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांना टाकतात. महागाई, बेरोजगारीवर बोलत नाहीत, ते मुस्लिम समाजावर बोलतात. धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका मेहबूब शेख यांनी यावेळी केली आहे.