पुणे शहरातील एका रुग्णालयात वीज बीलात बचत करण्यासाठी रुग्णालयाचे छतावर सौर उर्जा प्रकल्प लावण्याच्या आमिषाने एका डॉक्टरची साडेसात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी समर्थ पोलिसांनी आराेपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.
.
प्रदीप बबन जामदार (रा. बेंडा बुद्रुक, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या आराेपीचे नाव आहे. याबाबत डॉ.हमेंत शंकरराव ताेडकर (वय-47,रा.मंगळवार पेठ,पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डॉक्टरांचे मंगळवार पेठेतील पारगे चौकात रुग्णालय आहे. तक्रारदार डॉक्टरांच्या रुग्णालयातील छतावर सौर उर्जा प्रकल्प लावण्यात येणार होता. आरोपी जामदारने सौर उर्जा प्रकल्प बसवून देण्यासाठी जामदार यांनी साडेसात लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्याला सुरुवातीला 48 हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात सात लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर जामदारने काम अर्धवट सोडून दिले. सौर उर्जा प्रकल्प बसवून न देता तो पसार झाला. डॉक्टरांनी त्याच्याशी वेळाेवेळी संपर्क साधला. मात्र, त्याने काेणताही प्रतिसाद दिला नाही. सहायक पोलीस निरीक्षक एस पाटील पुढील तपास करत आहेत.
वर्क फ्राॅम हाेम बहाण्याने गंडा
बिबवेवाडी येथे राहणाऱ्या निकेत नितेश पारेख (वय-35) या तरुणाशी अज्ञात व्यक्तींनी संर्पक करुन त्यास वर्क फाॅर्म हाेम देण्याचा बहाणा करत एक लिंक पाठवली. त्यानंतर त्यास टेलीग्राम ग्रुप मध्ये अॅड करुन टास्क देण्याचे पार्टटाईम काम असल्याचे सांगत त्याच्या माेबदल्यात काही नफा देण्याचे अमिष दाखवून त्याच्याकडून आराेपींनी बँक खात्यावर एकूण पाच लाख दहा हजार रुपये घेऊन सदर रकमेची फसवणुक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करत आहे.