Lottery for 2030 houses of mhada mumbai division, draw date to be announced soon

म्हाडाच्या (mhada) मुंबई (mumbai) मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी 13 सप्टेंबरला सोडत काढली जाणार होती. मात्र काही कारणाने अर्ज विक्री-स्वीकृतीसह सोडतपूर्व प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने सोडत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता नक्की सोडत केव्हा जाहीर होणार याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यातही 7 किंवा 8 ऑक्टोबरला सोडत (lottery) जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुंबई मंडळाकडून अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटातील 2030 घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत काढण्यात आली. तर या सोडतीअंतर्गत अर्जविक्री-स्वीकृतीस 9 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली. ही प्रक्रिया सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने मुंबई मंडळाने सोडतीस 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या सोडतीतील सर्वच योजनेतील घरे प्रचंड महाग असल्याने सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे अर्जविक्री-स्वीकृतीची 4 सप्टेंबर अशी अंतिम मुदत पुढे ढकलत या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला.

त्यानुसार मागील आठवड्यात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अर्जविक्री-स्वीकृतीची अंतिम तारीख 19 सप्टेंबर अशी करण्यात आल्याचे जाहीर केले.

तर दुसरीकडे सोडतीतील पुनर्विकासाअंतर्गत प्राप्त झालेल्या 370 घरांच्या किमतीतही 10 ते 25 टक्क्यांनी कपात केली. या सर्व पार्श्वभूमीवर साहजिकच 13 सप्टेंबर रोजी होणारी सोडत पुढे गेली.

दरम्यान सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहीर करू असे मुंबई मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही नवीन तारीख तसेच पात्र अर्जदारांची अंतिम यादी केव्हा प्रसिद्ध होणार हेही अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सोडतीच्या तारखेकडे आणि सोडत पूर्व प्रक्रियेच्या वेळापत्रकाकडे अर्जदार, इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

अर्जदार आणि इच्छुकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. कारण मुंबई मंडळाने सोडतपूर्व प्रक्रियेचे वेळापत्रक आणि सोडतीची तारीख निश्चित केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 7 आणि 8 ऑक्टोबर अशा दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. 

यापैकी जी कोणती तारीख गृहनिर्माण मंत्र्यांकडून अंतिम होईल त्या तारखेला सोडत काढण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यानुसार एक-दोन दिवसांत तारीखेची घोषणा मंडळाकडून केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. त्याचवेळी वांद्रयातील (bandra) रंगशारदा सभागृह किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोडत होणार हेही एक-दोन दिवसांत अंतिम केले जाणार आहे.


हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24