उत्तम ज्ञानासाठी ग्रंथाशिवाय पर्याय नाही: विश्वास पाटील यांचे पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनावेळी प्रतिपादन – Pune News


उत्तम ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांना पर्याय नाही. ग्रंथ हे माणसाचे मित्र असून, ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सोबत असतात. पुस्तकांच्या वाचनातून आनंद मिळाल्यास जीवनात सुख प्राप्त होते. पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुणे शहर आगामी काळात पुस्तकांची पंढरी बनेल,

.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवारी जल्लोषात उद्घाटन झाले. यावेळी पाटील बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद कटिकर, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक डॉ. किरण ठाकूर, सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस आणि बागेश्री मंठाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक भारतीय व्यक्तीचा सरासरी सहा तासांचा वेळ मोबाईलवर जातो, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत मुलांना मोबाईल न देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन आपल्या उपस्थितीत झाल्याचा आनंद व्यक्त करत, त्यांनी या निमित्ताने पुण्यात ग्रंथांची पेठ उभी राहत असल्याचे नमूद केले. नव्या तंत्रयुगात ग्रंथांवर आणि पुस्तकांवर प्रेम करण्याची पालखी संयोजकांनी खांद्यावर घेतली असून, यातून उत्तमोत्तम विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मागील दोन पुणे पुस्तक महोत्सवांच्या शेवटच्या दिवशी होणारी गर्दी यंदा पहिल्याच दिवशी झाली. यावरून पुणेकर या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात, हे स्पष्ट होते. पुणे पुस्तक महोत्सवाने स्वतःची ओळख निर्माण केली असून, वाचन चळवळ वाढण्यास मदत होत आहे. पुणे शहर हे साहित्य, कला आणि संस्कृतीचे मानबिंदू आहे. महोत्सवात वाचकांची संख्या दरवर्षी वाढत असून, विक्रमी पुस्तक विक्री झाली आहे.

हा महोत्सव भारतीय विचार आणि संस्कृतीचा कार्यक्रम ठरला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये वाचण्याची आवड निर्माण होत आहे. भविष्यात हे महोत्सव ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील आणि तेथे ग्रंथालये व वाचनालये निर्माण करावी लागतील, असे मोहोळ यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुण्याचे नाव जगभर जावे आणि त्यातून मराठीसह इतर प्रादेशिक भाषांचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत मोहोळ यांनी पुणेकरांचे कौतुक केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सामाजिक आणि शैक्षणिक कामात मदत करताना खर्चाचा विचार करायचा नसतो. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १०० रुपयांचे कूपन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयांना पुस्तके खरेदी करण्यासाठी १० हजार रुपयांचे कूपन देण्यात येत आहे. आपले पुणे शहर हे पुस्तकांची राजधानी पुणे व्हावे, अशी आपल्या सर्वाची मागणी आहे. पुढच्या २०२६ वर्षासाठी पुस्तकांची राजधानी घोषित झाली आहे. त्यामुळे २०२७ मध्ये पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी बनविण्यासाठी पुणेकरांनी पुढील आठ दिवस मोठ्या संख्येने भेट देऊन, पुस्तकांची खरेदी करायची आहे. पुढचा पुणे पुस्तक महोत्सव हा जागतिक पातळीवरील पुस्तक महोत्सव करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करायचे आहे. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण मराठीत पुस्तके वाचायला हवी. मराठीत नाटके आणि सिनेमे पाहायला हवे. अशा पद्धतीने आपल्याला अभिजात मराठी भाषेला जगापुढे न्यायचे आहे. यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *