काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात मत घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. याद्वारे त्या
.
राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासह कर्नाटक व उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला. या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाची अक्षरशः पिसे काढत या घटनात्मक संस्थेने सत्ताधारी भाजपशी संधान साधल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाचे आता राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेही मतदार याद्यांमधील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
EC ने गांधींच्या प्रश्नांना उत्तर द्यावे – थोरात
बाळासाहेब थोरात म्हणाले की, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे. पण चोरी उघडी पडल्यामुळे भाजप अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे उलटसूलट बोलून मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची डिजिटल कॉपी काँग्रेसला दिली असती तर अनेक मतदारसंघांची तपासणी करता आली असती. पण त्यानंतरही राहुल गांधी व त्यांच्या टीमने 6 महिने सूक्ष्म अभ्यास करून हा सर्व प्रकार समोर आणला.
निवडणूक आयोगाने भाजपला मदत करण्यासाठी हेतूपुरस्सर अनेक गोष्टी केल्या. हा लोकशाहीपुढील खरा धोका आहे. संगमनेर मतदारसंघातही आम्ही आयोगाकडे काही माहिती मागितली होती. पण ती आम्हाला देण्यात आली नाही. यामुळे आमच्या मनातही अनेक शंका आहेत. शिर्डी मतदारसंघातही हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झाला. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. पण त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही, असे ते म्हणाले.
तेलंगण, कर्नाटकचे सरकार बोगस मतदानामुळे आले का? – विखे
दुसरीकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी व काँग्रेस नेते स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बेताल बोलत आहेत. तेलंगणात त्यांचे सरकार आल्यानंतर आम्ही बोगस मतदान झाल्याचा आरोप केला का? कर्नाटकचे सरकार बोगस मतदानामुळे आले का? काँग्रेसला लोकसभेच्या जागा बोगस मतदानामुळे मिळाल्या का? लोकांना यांचा खरा चेहरा समजल्यामुळे त्यांना विधानसभेला यश मिळाले नाही. लोकांनी महाविकास आघाडीला साफपणे धुडकावून लावले.
निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले. त्याला तुम्ही बोगस मतदान म्हणणार असाल, तर हा मतदारांचा अवमान आहे. राहुल गांधी भारतात कमी आणि परदेशात जास्त बोलतात. बोगस मतदानाचा आरोप शपथपत्रावर केला तर आरोप सिद्ध करावे लागतील. या प्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळे ते शपथपत्र देण्यास तयार नाहीत. राहुल गांधी यांना सध्या कुणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेद्वारे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले, पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. या पराभवाच्या कारणांचा आम्ही शोध घेतला. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 5 महिन्यांत मतदार यादीत 1 कोटी नव्या मतदारांची भर पडल्याची बाब आमच्या निदर्शनास आली. याच नव्या मतांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला असा एकंदरीत सूर राहुल यांनी आळवला होता. पण त्यानंतर आयोगाने या प्रकरणी स्पष्टीकरण न देता उलट राहुल यांच्याकडेच शपथपत्र मागितले.