.
सेंद्रिय पद्धतीने उत्पादित सकस विषमुक्त अन्नधान्य, फळे-भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढतच असून, इतर देशांना सेंद्रिय शेतमाल निर्यात होतांना शुद्धता, गुणवत्ता, प्रामाणिकरण अत्यावश्यक आहे असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.
कृषी पदवीधरांसाठी सेंद्रिय व्यवस्थापन पद्धती, प्रमाणीकरण हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शाश्वत रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती साधणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, इकोसर्ट, फ्रान्स, कॉटन कनेक्ट साऊथ एशिया यांच्या संयुक्त सहकार्याने २०२२ पासून देशातील पहिल्या सेंद्रिय व्यवस्थापन पद्धती, प्रमाणीकरण या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवली असून, अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या तुकडीच्या पदवीका प्रदान सारंभात ते बोलत होते.सेंद्रिय अभ्यासक्रमाचा पदविका प्रदान सोहळा कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख उपस्थितीत झाला. शेतकरी सदनाच्या कृषि जागर सभागृहात झालेल्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्यामसुंदर माने, डॉ. देवानंद पंचभाई, डॉ.धनराज उंदीरवाडे, इकोसर्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जाधव, मुकेश अपचंदा, कॉटन कनेक्ट साउथ एशियाचे वरिष्ठ व्यवस्थापक हेमंत कुमार ठाकरे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, प्रकल्प संचालक आत्मा, डॉ. मुरली इंगळे, डॉ. अनिता चोरे उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ. अनिता चोरे यांनी केले.
याप्रसंगी प्रवीण वानखडे, आशिष मुडावतकर यांनी अभिप्राय व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन कोंडे यांनी केले. आभार डॉ. किशोर बिडवे यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. परीक्षित शिंगरूप , अमोल हरणे , सौरभ अंभोरे, श्रीकृष्ण वाढे, अनिल काकडे, ईश्वर बोबडे यांनी परिश्रम घेतले.
अभ्यासक्रम कृषीक्षेत्रास नवा आयाम देणारा ठरेल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शंकर किरवे, प्रकल्प संचालक डॉ मुरली इंगळे यांनी हा अभ्यासक्रम हा कृषीक्षेत्रास नवा आयाम देणारा ठरेल याची खात्री व्यक्त केली जागतिक, देश पातळीवर सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा विस्तार पाहता या अभ्यासक्रमामधून कुशल मनुष्यबळ विकसित होऊन प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सोप्या पद्धतीने, जलदरीत्या पूर्ण करता येईल असा विश्वास व्यक्त केला.