पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत तिसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय मुलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी शिक्षक संजय फुंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शुक्रवारी आरोपी फुंदे यांचे निलंबन केले आहे. त्यासोबतच चौकशीची प्रक्रियाही सुरू केली आहे.
पीडित मुलीवर आरोपी शिक्षकाने वेळोवेळी अश्लील वर्तन करून अत्याचार केला होता. मुलीने आरडाओरड केल्यास तिला मारहाणही केली जात होती.
पीडित मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल करू नये यासाठी इतर चौघांनी दबाव आणला होता. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफास केला.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी तातडीने आरोपी शिक्षकाचे निलंबन करून चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोपीच्या कामाचे चार्जशीट भरले जाणार आहे.
———
कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणात गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी किसन आव्हाड यांनी केली. ही घटना दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आठ दिवसात या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही, तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर 15 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला.