हिंगोली शहरातील एनटीसी भागातील कापड दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम व ५० पैठणी साड्या असा ३ लाख रुपयांचा मुद्देमाल पळवल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ८ सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी हिंगो
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील नारायण नगर भागातील रहिवासी असलेले प्रतीक झंवर यांचे एनटीसी भागात रेडीमेड कपड्याचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे प्रतिक हे गुरुवारी ता. ७ रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील साहित्याची नासधुस केली. त्यानंतर दुकानात असलेल्या गल्ल्यात ठेवलेले ९६ हजार रुपये चोरट्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दुकानातील ५६०० रुपये किंमतीच्या ३० पैठणी साड्या व १८६० रुपये किंमतीच्या २० पैठणी साड्या अशा ५० पैठणी साड्या घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
दरम्यान, आज सकाळी प्रतीक हे दुकान उघडण्यासाठी गेले असतांना त्यांना दुकानाच्या शटरचे कुलुप तुटलेले दिसले. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शेख मुजीब यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दुकानात पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून संशयीतांच्या हाताचे ठसे घेतले आहेत.
या प्रकरणी प्रतीक यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.