Ajit Pawar In Chakan: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज चाकण शहर व एमआयडीसी परिसरात पहाणी दौरा करुन नागरी समस्या जाणून घेतल्या. एमआयडीसी परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येवर काय उपाय योजना करता येतील यासंदर्भात थेट नागरिकांमध्ये जाऊन अजित पवारांनी चर्चा केली. यावेळेस नागरिकांनी चाणकला बारामतीसारखं करा अशी मागणी केली असता अजित पवारांनी दोन्ही शहरांची तुलना करु नये अशी समजूत घातली. एकीकडे अशी समजूत घालताना चर्चेदरम्यान अजित पवारांनी खास आपल्या शैलीत काही जणांचा समाचारही घेतला.
चाकण अन् बारामतीची तुला नको
चाकणला महानगर पालिका करायचा विचार चाललाय, असं अजित पवारांनी स्थानिकांना सांगितलं. त्यावेळी एकाने चाकणही बारमतीसारखं करा अशा अर्थाचं विधान केलं. हे ऐकताच अजित पवारांनी, “बारामतीची तुलना चाकणशी करू नका,” असं म्हणत कार्यकर्त्याची समजूत काढली. येथील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी चाकणमध्ये महानगरपालिका आणण्याचे संकेत अजित पवारांनी दिले.
नेमकी काय माहिती दिली अजित पवारांनी?
चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे. त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली पण आता यातून सुटका करूयात,” असं अजित पवार स्थानिकांशी चर्चा करताना म्हणाले. “चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल. त्यानंतर मी जेवायला आलो तर माझं बिल घेऊ नका,” अशी मिश्किल टिपणी अजित पवारांनी करताच हशा पिकला.
नक्की वाचा >> ‘दिल्लीत तुम्ही महाराष्ट्राची लाज घालवली’, शिंदेच्या सेनेचा ठाकरेंवर घणाघात; ‘बाळासाहेबांनी आम्हाला..’
तेव्हा बील घेऊ नका असं अजित पवार म्हणाले अन् एकच हशा पिकला
“हॉटेल मालक मला म्हणाले अजित दादा नाष्टा करुन जा, पण आज खरंच वेळ नाही. पुढच्या वेळी आलो की नक्की जेवण करेन. तेव्हा मात्र माझं बिल घेऊ नका,” असं अजित पवार हसत हसत म्हणाले. “हा चेष्टेचा भाग झाला. मी स्पष्ट सांगतो. राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. हॉटेलमध्ये कोणी ही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल,” असंही अजित पवार म्हणाले.
खास शैलीत झापलं
दरम्यान, अजित पवारांच्या भाषणादरम्यान बोलणाऱ्या एका उत्साही कार्यकर्त्याला अजित पवारांनी आपल्या खास शैलीत झापले. “आम्ही काय बिनडोक आहोत का? तुम्हालाच लय कळतं व्हंय? असा सवाल विचारत अजित पवारांनी भाषणात अडथळा आणण्याऱ्याचा समाचार घेतला.
पुणे जिल्ह्यातील चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येला घेऊन आज प्रत्यक्ष चाकण येथे विविध ठिकाणी पाहणी केली. या पाहणीवेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. वाहतूक कोंडी होण्याची प्रमुख कारणं… pic.twitter.com/fsnT4qp6U9
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 8, 2025
अजित पवारांसोबत कोणकोण होतं?
या पाहणीवेळी अजित पवारांबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांही उपस्थित होते. नागरिकांकडून समस्या ऐकून घेतल्यानंतर अजित पवारांनी या अधिकाऱ्यासोबत लगेच चर्चा केली. वाहतूक कोंडी होण्याची प्रमुख कारणं समजून घेतली आणि अधिकाऱ्यांना यावर त्वरित उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.