‘अरे इथला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे?’, अजित पवारांनी सर्वांसमोर दिली तंबी, ‘तू माझ्या हाताखाली…’


Ajit Pawar in Beed: उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी गुरुवारी सकाळी पावणे सहा वाजताच आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या महसूल भवनाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी त्यांनी कंत्राटदाराला कडक शब्दांत खडसावलं. चांगलं काम केलं नाही तर तुम्हाला काळ्या यादीत टाकेन असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे, दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र सकाळपासूनच दिसून आलं.

अजित पवारांनी महसूल भवनाची पाहणी करताना कंत्राटदाराला खडसावत इथे चुकीचा प्रकार चालणार नाही असं सांगितलं. “कोणाला काहीही द्यायचं काम नाही. राज्याला आम्ही 1100 ते 1200 कोटींचा निधी दिला आहे. तुम्ही जर चांगलं काम केलं नाही, तर ब्लॅक लिस्टमध्ये टाकेन. तुम्ही माझ्या हाताखाली काम करता.  इथे चुकीचे प्रकार चालणार नाहीत,” अशी तंबीच अजित पवारांनी दिली. अजितदादांच्या दौऱ्या दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे देखील चित्र सकाळपासूनच दिसून आले.

…तर मी पालकमंत्रीपद सोडतो, अजित पवार संतापले

अजित पवार जिल्हा क्रीडा संकुलावर पोहोचल्यानंतर तिथे उपस्थित असलेले काही खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांनी विविध सूचना आणि समस्या मांडल्या. यावेळी अजित पवार यांनी याआधी तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं, त्यांनी काहीच केलं नाही. आता मला कोणाचे काही काढायचे नाही. परंतु मी करायला लागलो, तर मलाच ढुसण्या मारायला लागले. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही. तुम्ही सहकार्य करा. मी पण सहकार्य करतो. नाहीतर मी परत जातो. मग कुणाला पालकमंत्री करायचं असेल, त्यांना पालकमंत्री करा, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. 

पोस्ट करत दिली दौऱ्यातील घडामोडींची माहिती

अजित पवारांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं आहे की, “आज बीड शहरातील चंपावती क्रीडा मंडळ, कंकालेश्वर मंदिर आणि जिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांची पाहणी केली. शहरात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेत, संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रत्येक प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कामांची गुणवत्ता, टिकावूपणा आणि वेळेचं नियोजन यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले”.

“कंकालेश्वर मंदिर येथे पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. हे देवस्थान बीड शहरासह जिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. यानिमित्तानं कंकालेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. कंकालेश्वर देवस्थान परिसरात नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधत बीडकरांना कायम स्मरणात राहील. तसंच बीडच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार कामं करावी. विकासकामं करताना ती कामं गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावं. भाविकांना सर्व सोयीसुविधा मिळतील अशा सर्व बाबींचा आराखड्यामध्ये समावेश करावा, अशा सूचना दिल्या,” असंही त्यांनी सांगितलं आहे. 

“जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाची माहिती घेतली. क्रीडा संकुलाच्या कामामुळे बीडकर नागरिकांना सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, क्रीडा संकुलालगत असलेला संपूर्ण परिसर स्वच्छ करावा, या परिसरात कुठेही कचरा दिसणार नाही याबाबत नगरपालिका प्रशासनानं दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले,” अशी माहिती त्यांनी दिली. 

“जिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या कामाचीही पाहणी केली. इमारतीची कामं करताना आगामी ५० वर्षांचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. वीज, वाहनतळ, अग्निशामन यंत्रणा, सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला पाहिजे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटेल, असं कामं झालं पाहिजे, अशा सूचना केल्या,” असंही त्यांनी सांगितलं. 

FAQ 

1) अजित पवार यांचा बीड जिल्हा दौरा कधी आणि का आयोजित करण्यात आला?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी बीड जिल्ह्यातील दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्याचा उद्देश बीड शहरातील महसूल भवन, क्रीडा संकुल, कंकालेश्वर मंदिर आणि जिल्हा रुग्णालय येथील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची पाहणी करणे आणि आढावा घेणे हा होता.

2) अजित पवार यांनी पालकमंत्रीपद सोडण्याबाबत काय म्हटले?

जिल्हा क्रीडा संकुलात नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर संताप व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, “तुम्ही सहकार्य करा, मीही सहकार्य करतो. नाहीतर मी परत जातो. मग कुणाला पालकमंत्री करायचे असेल, त्यांना करा.”

3) या दौऱ्याचा बीड जिल्ह्यासाठी काय फायदा होईल?

या दौऱ्यामुळे बीड शहरातील विकासकामांना गती मिळेल, विशेषतः महसूल भवन, क्रीडा संकुल, कंकालेश्वर मंदिर आणि जिल्हा रुग्णालय येथील प्रकल्पांना. गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण झाल्यास नागरिकांना सुसज्ज सुविधा मिळतील.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24