‘खालिद का शिवाजी’च्या प्रदर्शनाला एक महिन्याची स्थगिती: केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा निर्णय, चित्रपटाचे पुन्हा होणार परीक्षण


मुंबई11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर केंद्र सरकारच्या आदेशानुसार एका महिन्याची स्थगिती घालण्यात आली आहे. दिग्दर्शक राज मोरे यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट पुन्हा एकदा परीक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला असून प्रदर्शनासाठी सध्या स्थगिती आणली आहे.

हा चित्रपट 8 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील काही संवादांवर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप नोंदवत सरकारकडे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही केंद्र सरकारकडे पत्र पाठवून या चित्रपटाचे प्रदर्शन त्वरित थांबवण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज दुपारनंतर साडे चार वाजता दिग्दर्शकांना त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे.

चित्रपटाचे पुन्हा होणार परीक्षण

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून पुन्हा एकदा चित्रपटाचे परीक्षण करण्यात येणार आहे. एक महिन्याच्या काळात परीक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होईल.

आशिष शेलार यांचे ट्विट

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणलेल्या स्थगितीबाबत माहिती देणारे ट्विट केले आहे, ते म्हणाले, चित्रपट ‘खालिद का शिवाजी’ याचे प्रदर्शन माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांनी एक महिन्यासाठी स्थगित केले आहे. हे स्थगन महाराष्ट्र सरकारकडून चित्रपटातील ऐतिहासिक चुकीबाबत आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत व्यक्त केलेल्या चिंता लक्षात घेऊन करण्यात आले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट प्रमाणन अधिनियम, 1952 च्या कलम 6(2) अंतर्गत या चित्रपटाचे प्रमाणपत्र एक महिन्यासाठी स्थगित केले आहे.

महाराष्ट्र सरकारने चित्रपटामधील ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास आणि सांस्कृतिक भावना दुखावण्याबाबत शक्यता व्यक्त केली असून विशेषतः आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सव सणाच्या काळात समाजभावना दुखावल्या जाऊ नये या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रोहित पवार यांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना या चित्रपटाबद्दल बदलेल्या भूमिकेवरून सवाल केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, मा. आशिष शेलार जी आपण ’खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्समध्ये स्तुती केली व आपल्या विभागाने सर्व गोष्टी तपासून हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवून या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला त्याबद्दल आपलं अभिनंदन!!

सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून आपलं काम चोख आहे, मात्र आता केवळ काही ठराविक संघटना याला विरोध करत आहेत म्हणून उद्या चित्रपट प्रदर्शित होत असताना सरकार आज दिग्दर्शकाला नोटीस पाठवते, हे दुर्दैवी आहे. यावरून मा. आशिष जी या सरकारमधीलच काही लोकांकडून आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का, असा प्रश्न पडतो.

एखाद्या चित्रपटावर अनेकांचे भविष्य अवलंबून असतं, त्यामुळे आपण या दबावाला बळी न पडता या चित्रपटाच्या पाठीशी ठामपणे उभे राहाल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24