राहुल गांधी हरतात तेव्हाच आरोप करतात: हा त्यांचा करंटेपणा, एकनाथ शिंदेचा हल्लाबोल; तर म्हस्के म्हणाले – हे पोरकटपणाचे लक्षण – Maharashtra News



निवडणूक आयोगाने भाजपसोबत मिळून निवडणूक चोरल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. महाराष्ट्रात 40 लाख संशयित नावे असल्याचा दावाही त्यांनी केला. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार

.

राहुल गांधी यांची आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर निवडणूक चोरीला गेल्याचा आमचा संशय निश्चित झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मशीन रीडेबल मतदार यादी न देऊन, निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्र निवडणूक चोरली आहे याची आम्हाला खात्री पटली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून आता सत्ताधारी राहुल गांधींना लक्ष्य करत आहेत.

नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?

बिहारच्या निवडणुकीत आपला पराभव होणार असल्याचा अंदाज विरोधकांना लागला आहे. त्यामुळे हे सगळे रडगाणे सुरू आहे. आम्ही म्हणालो होतो असे असे चाललेले आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला, मतांची चोरी केली. यासाठी राहुल गांधींचे एक ग्राउंड तयार करायचे काम सुरू आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.

मनमोहन सिंग सरकारमध्ये एम. एन. गिल यांनी हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला. हा सगळ्यात मोठा घोटाळा होता. त्या माणसाला काँग्रेसने मंत्री बनवून पारितोषिक दिले. त्यामुळे त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा काही एक अधिकार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

हा राहुल गांधींचा करंटेपणा

विरोधकांचा जेव्हा पराभव होतो, तेव्हा निवडणूक आयोग, ईव्हीएम या सगळ्यावर चोरीचा आळ घेतात. राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. विरोधी पक्षनेते असताना निवडणूक आयोगाचे, निवडणुकीचे आणि मतांचे राहुल गांधी यांना भान असायला पाहिजे. हे केवळ निवडणूक आयोगाचा अपमान करत नाहीत, तर लाखो मतदारांचा अपमान आहे. म्हणून ही जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

…तर त्याला आम्ही मतांची चोरी केल्याचे म्हणायचे का?

महाराष्ट्रात १ लाख १८६ बूथ आहेत. एका बुथवर फक्त ७० मते वाढली, तर सर्व बुथवर मिळून ७० लाख पेक्षा जास्त मते होतात. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर सर्वांनी महायुतीला विजयी करायचे ठरवले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. पण राहुल गांधी हे मान्य करायला तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची मतांची टक्केवारी वाढली. त्यांना ३० जागा मिळाल्या. महायुतीला १७ जागा मिळाल्या. जनतेचा कौल आम्ही मान्य केला. फेक नरेटीव्हद्वारे त्यांनी मते मिळवली. त्याला आम्ही मतांची चोरी केली, असे म्हणायचे का? राहुल गांधी हे आता देखील फेक नरेटीव्ह पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांनी हे बंद करावे. त्यांनी जबाबदार विरोधीपक्ष नेता म्हणून काम केले पाहिजे, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना दिला.

असे आरोप करणे राहुल गांधींचा पोरकटपणा – म्हस्के

आम्हाला गडबड करायची असती, तर लोकसभा निवडणुकीत केली असती, आमच्यासाठी लोकसभा महत्त्वाची होती. पण आता त्यांचा पराभव झाल्यामुळे ते आमच्यावर आरोप करत आहेत. लोकसभेला विजय झाल्यानंतर त्यांनी असे आरोप का केले नाहीत? तो त्यांचा पोरकटपणा आहे. ते बालिषपणासारखे आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.

त्यांचे उमेदवार दारू पिऊन झोपले होते का?

ज्याठिकाणी मतदारांची संख्या वाढल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत, त्या ठिकाणी त्यांचे उमदेवार दुपारी दोन वाजेनंतर दारू पिऊन झोपले होते का? असा खोचक सवाल शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. आपला पराभव मान्य केला पाहिजे. लोकसभेवेळी घटना बदलणार असा चुकीचा नरेटीव्ह पसरवल्याने त्यांना मते मिळाली. राहुल गांधींचे पोरकटपणाचे लक्षण जनतेच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी विधानसभेला त्यांना मते मिळाली नाही, असेही नरेश म्हस्के म्हणालेत.

खोलीत कोंडून घेत रडण्याचा राहुल गांधींना सल्ला

राहुल गांधी यांचे मन साफ नाही. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव त्यांना सहन होत नाहीये. त्यामुळे ते अशाप्रकारचे आरोप करत असतात. त्यांनी एक संपूर्ण दिवस स्वत:ला खोलीत कोंडून घेऊन मन भरून रडून घ्यावे. तुमच्या मनात जे काही साठलेले आहे, ते बाहेर काढा. असे केल्याने त्यांचे मन साफ होईल, असा बोचरा सल्ला नरेश म्हस्के यांनी दिला.

हे ही वाचा…

मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली:देवेंद्र फडणवीसांचा पलटवार; ते खोटे बोलून पळून जात असल्याचा आरोप

महाराष्ट्रात आणि देशात कुठेही मतदानाची चोरी झालेली नाही. तर राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी प्रत्येक वेळी खोटे बोलून पळून जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वास्तविक आगामी काळातील निवडणुकीत त्यांना पराजय दिसत आहे. त्यामुळे आधीच कव्हर फायरिंग साठी ते असे आरोप करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *