शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला राजकीय दृष्टिकोनातून मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्लीत आगमनानंतर उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे नेते संजय राऊत आणि इतर शिवसेना
.
याच दौऱ्याचा एक भाग म्हणून ठाकरे कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली. या स्नेहभेटीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.
शरद पवार यांनी या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली. “आज माझ्या दिल्ली येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली.” असे शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या भेटीत खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, फौझिया खान, अमोल कोल्हे, संजय दिना पाटील, निलेश लंके, भास्कर भगरे, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग सोनवणे, तसेच आमदार मिलिंद नार्वेकर आणि सलील देशमुखही सहभागी होते.
इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार उपस्थित
उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा मुख्यत्वे 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अन्य महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेतेही या बैठकीत सामील होणार असून, मतदार यादीतील विसंगती, बिहार विधानसभा निवडणूक, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, तसेच राष्ट्रीय राजकारणाशी संबंधित मुद्यांवर आघाडीची भूमिका ठरवली जाणार आहे.
या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून, उद्धव ठाकरे कुटुंबीय त्या निमंत्रणासही उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांनी स्वतः फोन करून उद्धव ठाकरेंना या बैठकीचे आमंत्रण दिले होते.
शिवसेना खासदारांशी स्वतंत्र बैठक
दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे हे आपल्या गटातील शिवसेना खासदारांशी स्वतंत्र बैठक घेणार असून, आघाडीतील सहकार्य, संसदीय धोरण, आणि आगामी निवडणुकांची तयारी यासंबंधी धोरणात्मक चर्चा होणार असल्याचे समजते.
आदित्य ठाकरे यांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा
दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. या बैठकीत मुंबई पोर्ट ट्रस्ट ससून डॉक परिसरातील मत्स्य व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा झाली. MFDC (मरीन फिशरीज डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह) संस्थेला मिळणाऱ्या भाड्याच्या मुद्यावर चर्चा करताना, “या मत्स्य व्यवसायिकांना त्रास देऊ नये,” अशी विनंती आदित्य ठाकरेंनी केली. यावर मंत्री सोनोवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, अशा प्रकारचा त्रास होणार नाही असे आश्वासन दिले.
तसेच, शिवडी-बीबीटी परिसरातील पुनर्विकासही या चर्चेतील महत्त्वाची बाब होती. आदित्य ठाकरेंनी सांगितले की, “वरळी भागातील चाळींप्रमाणे या परिसराचाही पुनर्विकास करावा,” अशी विनंती त्यांनी केली.
हे ही वाचा…
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा:एकनाथ शिंदेंची माहिती, आगामी निवडणुका महायुतीमध्ये लढवण्याचे केले जाहीर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून, उपराष्ट्रपती पदाच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ठाम पाठिंबा देणार असल्याची घोषणा खुद्द शिंदे यांनी केली आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून एकत्र लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा…