Tulja Bhavani: तुळजाभवानीच्या शिल्पावरून नवा वाद निर्माण झालाय. तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीचं शिल्प उभारण्यात येणार आहे.. दरम्यान देवीचं रूप हे अष्टभुजा असावं की द्विभुजा यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नेमकं काय प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
तुळजाभवानीचं शिल्प
तुळजापुरात उभारण्यात येणा-या 108 फुटी तुळजाभवानीच्या शिल्पावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. शिल्पातील देवीचं रूप हे अष्टभुजा असावं की द्विभुजा यावरून मतमतांतर निर्माण झाले आहेत. या शिल्पासाठी शिल्पकारांकडून तीन फूट उंच फायबर मॉडेल मागवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कला संचनालयाने दिलेल्या निर्देशांनुसार देवीचं रूप अष्टभुजा असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे तुळजापुरात उभारलं जाणारं तुळजाभवानीचं शिल्प हे अष्टभुजाचं असणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
इतिहासतज्ज्ञांना विश्वासात न घेतल्याचा आरोप
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी याआधीच अष्टभुजा स्वरूपातील संकल्पचित्र संकेतस्थळावरून हटवण्याचे निर्देश दिले होते. तर शिल्पाचं स्वरूप ठरवतांना स्थानिक लोकप्रतिनिधी, इतिहासतज्ज्ञांना विश्वासात न घेतल्याचा आरोप आमदार कैलास पाटलांनी केलाय.
पुजारी मंडळ आणि राजकीय नेत्यांमध्ये मतमतांतर
1 हजार 865 कोटींच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यात 108 फुट उंच शिल्प उभारण्याची घोषणा करण्यात आलीय. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं हे भव्य शिल्प साकारलं जाणार आहे. मात्र, देवीचं रुप कसं असलं पाहिजे यावरून पुजारी मंडळ आणि राजकीय नेत्यांमध्ये मतमतांतर दिसून येत असून वाद निर्माण झाला आहे.
FAQ
1. तुळजापूरमधील तुळजाभवानीच्या शिल्पाबाबत नेमका काय वाद आहे?
तुळजापूर येथे उभारण्यात येणाऱ्या 108 फुटी तुळजाभवानी शिल्पाच्या स्वरूपावरून वाद निर्माण झाला आहे. शिल्पातील देवीचे रूप अष्टभुजा असावे की द्विभुजा, यावरून पुजारी मंडळ, राजकीय नेते आणि स्थानिकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
2. तुळजाभवानीच्या शिल्पाचे स्वरूप कोणते असणार आहे?
कला संचनालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, तुळजाभवानीच्या शिल्पाचे स्वरूप अष्टभुजा असणार आहे. शिल्पकारांना तीन फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार करण्यास सांगितले असून, यामध्ये देवी अष्टभुजा स्वरूपात दाखवली जाणार आहे, असे जवळपास निश्चित झाले आहे.
3. या शिल्पाचा उद्देश काय आहे?
महाराष्ट्र शासनाने 1,865 कोटी रुपये खर्चून तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत, छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना दर्शवणारे 108 फुटी भव्य शिल्प उभारण्याची योजना आहे.