Maharashtra Weather News : मुंबईच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या 24 तासांपासून पावसानं उसंत घेतली असून, अंशत: ढगाळ वातावरण वगळता पावसानं दडीच मारल्याचं पाहायला मिळालं. विदर्भात मात्र चित्र काहीसं वेगळं असून, पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचच वर्चस्व पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ केएस होसाळीकर यांनी राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात पावसाची हजेरी असेल हे स्पष्ट केलं.
कुठे बरसणार गडगडाटी पाऊसधारा?
हवामान तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा तर कुठं गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्याच्या घडीला तामिळनाडूमध्ये समुद्रकिनारी भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असून अरबी समुद्राच्या मध्यावर पूर्व- पश्चिमेस कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्या कारणानं देशासह राज्यातील पावसावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारकी करण्यात आला आहे. ज्यानुसार लातूर, सोलापूर, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं पावसाची दमदार हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे.
कोकण-गोव्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/BXIBtO5GXY
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 4, 2025
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर इथंही पावसाचे ढग दाटून येत धाटमाथ्यावर ढगांची दाटी पाहायला मिळणार आहे. तर, इथं विजांच्या कडकडाटासह पावसाचीसुद्धा हजेरी असेल असा इशारा हवामान विभागाच्या वतीनं जारी करण्यात आला आहे.