पुणे येथील गुजर निंबाळकरवाडी येथे पोलिस आणि प्रशासनाची परवानगी न घेता बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी आयोजकांसह १४ हून अधिक जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
आरोपींमध्ये आदित्य सनस, ऋषभ बालचंद्र धावडे, हेमंत मुकुंद बेंद्रे, रोहीत भारत रणमळे, आदित्य मोहन शिंदे, ओमकार इंगवले, दिगंबर होळवले, प्रथमेश गातळे, अनिकेत बगडे, सादिक शिंदे, सुरज मिंडे, लखन विक्रम पवार यांचा समावेश आहे. पोलिस अमंलदार सचीन तात्याराव पवार (३९) यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे.
३ ऑगस्ट रोजी दुपारी घडलेल्या या प्रकरणात शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय अधिकारी, अॅम्बुलन्स, पोलिस बंदोबस्त यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच शर्यतीच्या ठिकाणी कोणतेही बॅरेकेटिंग नव्हते. सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता बैलगाडी शर्यत भरवून तेथे जमलेल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण केला.
पोलिसांनी आयोजकांना व बैलगाडा मालकांना शर्यत थांबविण्याचे तोंडी आदेश देऊनही त्यांनी शर्यत चालू ठेवली. यावेळी बैलांना क्रूरपणे चाबकाचे फटके देण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात आरडाओरडा करून पोलिसांच्या आदेशाचा अवमान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, येरवडा येथील शांतीनगरमध्ये नळ दुरुस्त करताना पाणी दारात गेल्याने लोखंडी हत्याराने व रॉडने मारहाण करून शिवीगाळ करणाऱ्या चौघांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल हमीद शेख (५०), सीतारा शेख (३२), शोयब शेख (२४) आणि आसिफ शेख (२४) यांच्याविरुद्ध अशिश रामअवतार गुप्ता (२६) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.