अमरावती महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हॉकर्सनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या विरोधात हॉकर्स युनियनने सोमवारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी खेळण्यातील बंदुका हातात घेऊन निदर्शने केली.
.
हॉकर्स युनियनने मंगळवारपासून महापालिकेचा दैनंदिन १० रुपयांचा कर न देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आपका हॉकर्स सेवक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गाडगेनगरातील हॉकर्स गणेश मारोडकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मारोडकर हे टाऊन वेंडींग कमिटीचे (टिव्हीसी) सदस्यही आहेत.
मारोडकर यांच्या मते, अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने शहरातील सर्व हॉकर्सना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यासाठी हॉकर्स झोन निश्चित करून त्याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांनी महापालिकेवर टीव्हीसीची बैठक न घेता एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप केला.
सोमवारी दुपारी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हॉकर्स एकत्र झाले. त्यानंतर मारोडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा जिल्हाकचेरीपर्यंत पोहोचला. तेथे छोटेखानी सभा झाली आणि हॉकर्सनी आपापले व्यवसाय बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे अभिवचन दिले.
आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर केले. हॉकर्सनी महापालिकेवर दुहेरी मापदंड वापरल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, महापालिकेने राजकमल चौकातील मुख्य इमारतीसमोर व्यापारी संकुल उभारताना पार्किंगसाठी जागा सोडली नाही आणि पार्किंगच्या जागेवरही व्यापारी गाळे बांधले आहेत. हॉकर्सनी महापालिकेने आधी स्वतःचे अतिक्रमण हटवावे आणि शहरातील प्रभावशाली नागरिकांनी केलेले अतिक्रमणही हटवावे अशी मागणी केली आहे.